Bharat Bandh : सटाण्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसेचा रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. यावेळी इंधन दरवाढ नियंत्रित करण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून सायकलवर स्वार होत अनोख्या पद्धतीने मोदी सरकारचा निषेध केला.

सटाणा - इंधन दरवाढीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपास सटाणा शहर व बागलाण तालुक्यात आज सोमवार (ता.१०) रोजी संमिश्र प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. यावेळी इंधन दरवाढ नियंत्रित करण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून सायकलवर स्वार होत अनोख्या पद्धतीने मोदी सरकारचा निषेध केला. दरम्यान, एस टी आगार प्रशासनाने बससेवा बंद ठेवल्याने सर्वसामान्य प्रवाशांना बंदचा मोठा फटका सहन करावा लागला.

आज सकाळी ११ वाजता माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम व मनसेचे शहराध्यक्ष पंकज सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते अचानक बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर एकत्रित आले. यावेळी कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीविरोधात केंद्र शासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत महामार्गावर ठिय्या दिला आणि रास्ता रोको आंदोलन सुरु केले. त्यामुळे महामार्गावरील दुतर्फा वाहतुक ठप्प झाली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. यावेळी बोलताना माजी आमदार चव्हाण म्हणाले, सत्तेत आल्यापासून केंद्र शासनाने पेट्रोल, डीझेल, घरगुती गॅस यांची सातत्याने मोठी दरवाढ केली आहे. महागाईचा भस्मासुर वाढल्याने सर्वसामान्यांच्या घराचे बजेट कोलमडले असून जनता होरपळून निघाली आहे. वाहतूक व दळणवळणही महागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र हुकुमशाही पद्धतीने राज्य करीत असून काहीही बोलायला तयार नाहीत. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणण्यास केंद्र शासन अपयशी ठरले आहे. येत्या निवडणुकीत सर्वसामान्य जनता या भाजप सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. शासनाने ही दरवाढ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही श्री. चव्हाण यांनी दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सूर्यवंशी, पंकज सोनवणे, किशोर कदम आदींची भाषणे झाली.

आंदोलकांतर्फे तहसीलदार प्रमोद हिले व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. अनिल पाटील, कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, नगरसेवक दिनकर सोनवणे, पंडितराव अहिरे, ज.ल. पाटील, माजी नगराध्यक्ष भारत खैरनार, जे. डी. पवार, राजेंद्र सावकार, परशुराम अहिरे, रत्नाकर सोनवणे, अण्णा सोनवणे, नितीन सोनवणे, दादू सोनवणे, रवींद्र पवार, मनोज ठोळे, सिराज मुल्ला, रिजवान सैय्यद, बबलू शेख, यासिर शेख, धीरज बागुल, राकेश सोनवणे, सचिन साखला, रमेश सूर्यवंशी, चंद्रकांत सोनवणे आदींसह कार्यकर्ते सहभागी होते.

खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लुट... 
बंदच्या पार्श्वभूमीवर आज सटाणा आगारातून नाशिक व मुंबईसह सर्व लांब पल्ल्याच्या बसेस बंद ठेवण्याचा निर्णय आगार प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. बसेस बंद असल्याने काही खासगी वाहतूकदारांनी नाशिकसाठी तब्बल २०० ते २५० रुपये प्रवास भाडे आकारून प्रवाशांची लुट केली. तालुक्याच्या ग्रामीण भागातील बससेवा मात्र सुरळीत सुरु होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: responce to bharat bandh satana