रिक्षाचालकांच्या 'कोणत्या' वागणुकीमुळे होतोय प्रवाशांचा संताप?

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 4 December 2019

सुरवातीला तीन प्रवाशांनी मिळून भाडे द्यायचे का, की प्रत्येकाने वेगवेगळे भाडे द्यायचे याबाबत संभ्रम होता. मात्र, आरटीओने प्रतिप्रवासी भाडे द्यायचे असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे भाडेदर जास्त असल्याने आता प्रवाशांनी शहर बसगाडीला प्राधान्य दिले आहे. 

नाशिक : नाशिक शहर हद्दीत "आरटीओ'ने शेअर रिक्षाथांबे आणि मार्ग ठरवून दिलेले असतानाही रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडेवसुली केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लूट होत असून, रिक्षाचालकांनी त्याचे खापर आरटीओवर फोडले आहे. त्याचा परिणाम प्रवाशांवर होत असून, तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

रिक्षाचालकांकडून लूटमार सुरूच 
प्रादेशिक परिवहन विभागाकडून शेअर रिक्षासाठी रिक्षाथांबे, मार्ग ठरवून देण्यात आले आहेत. आरटीओच्या मान्यतेनुसार प्रवाशांकडून भाडेआकारणी करणे बंधनकारक आहे. मीटरप्रमाणे किंवा ठरवून दिलेल्या भाडेदराप्रमाणे भाडे न घेणाऱ्या रिक्षाचालकांवर आरटीओकडून कारवाईही केली जात आहे. हे भाडेदर प्रवाशांच्या आवाक्‍याबाहेरचे असल्याने नाराजी आहे. जुन्या दरानेच भाडे घेण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. आरटीओने रविवारी मोहीम राबवून जादा प्रवासी भाडे घेणाऱ्या किंवा मीटरप्रमाणे रिक्षा वाहतूक न करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केली. त्याप्रमाणे सोमवारीही (ता. 2) तपासणी मोहीम राबवून कारवाई करण्यात आली. शेअर रिक्षाचे भाडेदर पहिल्यापेक्षा जादा असल्याने प्रवाशांना आर्थिक फटका बसतो आहे. सुरवातीला तीन प्रवाशांनी मिळून भाडे द्यायचे का, की प्रत्येकाने वेगवेगळे भाडे द्यायचे याबाबत संभ्रम होता. मात्र, आरटीओने प्रतिप्रवासी भाडे द्यायचे असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे भाडेदर जास्त असल्याने आता प्रवाशांनी शहर बसगाडीला प्राधान्य दिले आहे. 

हेही वाचा > उद्योजकाने 'त्याच्या'वर विश्वास ठेवला..अन् दिली गोपनीय माहिती..पण... 

ही मोहीम आठवडाभर सुरू राहील - वाहतूक शाखा

शहर वाहतूक पोलिसांनी सोमवारी (ता. 2) बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात कारवाईचा बडगा सुरूच राहिला. 128 रिक्षाचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करीत 32 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. कागदपत्रे व फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या 30 रिक्षा ताब्यात घेण्यात आल्या. ही मोहीम आठवडाभर सुरू राहील, असे वाहतूक शाखेने संकेत दिले. 

हेही वाचा > प्रसुतींच्या कळांनी बिथरली होती 'ती'...त्यातच तिला दिसला 'तो'

आरटीओच्या निर्णयात संभ्रम; प्रवाशांच्या खिशाला कात्री 
आरटीओने केलेल्या प्रवासी भाड्यासंदर्भात अजूनही संभ्रमावस्था आहे. प्रवाशांमध्ये तो कायम आहे. त्यामुळे प्रवासी व रिक्षाचालकांत वाद होत आहेत. आरटीओ, पोलिसांनी संयुक्तरीत्या यावर विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे. त्यानुसार आम्ही त्याची अंमलबजावणी करू. - सय्यद शकील, रिक्षा युनियन   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rickshaw driver taking extra fare from passengers at Nashik Marathi News