महामार्गावर ट्रकसमोर रिक्षा आडवी लावून लुटले 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 जून 2018

महामार्गावर ट्रकसमोर रिक्षा आडवी लावून लुटले 

महामार्गावर ट्रकसमोर रिक्षा आडवी लावून लुटले 

जळगाव, ता. 19 : राष्ट्रीय महामार्गावर ट्रकसमोर रिक्षा आडवी लावून लूट केल्याची घटना घडली. चालक, क्‍लिनरला बेदम मारहाण करून त्यांच्याकडून नऊ हजारांचा ऐवज लुटून नेणाऱ्या तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. 
राष्ट्रीय महामार्गावरून नाशिक जिल्ह्यातील कळवण येथून छत्तीसगड पासिंगचा ट्रक (सीजी 07, बीजी 6300) कांदा भरून भुवनेश्‍वर (ओरिसा) येथे निघाला होता. नाशिक येथून नागपूर महामार्गाने जात असताना नसिराबाद जवळील महिंद्रा शोरुमजवळ पहाटे पाचच्या सुमारास विनानंबरच्या रिक्षाचालकाने ट्रकसमोर रिक्षा आडवी लावून ट्रकचालक परविंदर सिंग सुखदेवसिंग (रा. छत्तीसगड) व क्‍लीनर या दोघांना रिक्षातील तिघांनी 17 जूनला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर चालक व क्‍लीनर यांच्या खिशातील मोबाईल व रोख असा नऊ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. भीतीपोटी ट्रकचालकाने तक्रार न करता भुसावळपर्यंत ट्रक नेला. तेथे एका ढाब्यावर जेवणासाठी थांबले असताना टपरी चालकाला घटना सांगितल्यावर त्याने नसिराबाद पोलिस ठाण्याचा पत्ता चालकाला दिला. आज कांद्याचा माल खाली करून ट्रकचालक परमिंदरसिह परत आल्यावर त्याने नसिराबाद पोलिसांत तक्रार दाखल केल्यावरून तीन संशयितांविरुद्ध जबरी लूट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 
"त्रिदेव' नावाने लागला शोध 
रिक्षावर नाव नसल्याने ट्रकचालक परमिंदरसिह याने रिक्षावर "त्रिदेव' लिहिलेले असल्याचे लक्षात ठेवले होते. त्याच आधारे सहाय्यक निरीक्षक आर. टी. धारबडे, रामकृष्ण पाटील यांच्या मदतीने संशयिताचा शोध सुरू होता. विनानंबरच्या त्रिदेव रिक्षाला शोधून काढत घटनेच्या दिवशी विशाल विक्रम भोई (वय 18, रा. वाल्मीकनगर), प्रद्युम्न ऊर्फ बंटी नंदू महाले (वय 19, खंडेरावनगर), संदीप ऊर्फ गोलू जयसिंग सोनवणे (वय 18, रा. शनिपेठ) अशा तिघा संशयितांना आज रात्री अटक करण्यात आली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. 
 

Web Title: riksha