रस्ते, जलवाहिनीच्या ‘अमृत’ला गुरुवारी प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतून ‘ई’ भूमिपूजन : पंतप्रधान घेणार जळगावचा आढावा

जळगाव - येथील रस्ते, जलवाहिनीचे रूप पालटणाऱ्या ‘अमृत’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ गुरुवारी (१३ एप्रिल) होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील त्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानातून संगणकावरील कळ दाबून राज्यभरात योजनेचा प्रारंभ करतील.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतून ‘ई’ भूमिपूजन : पंतप्रधान घेणार जळगावचा आढावा

जळगाव - येथील रस्ते, जलवाहिनीचे रूप पालटणाऱ्या ‘अमृत’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ गुरुवारी (१३ एप्रिल) होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील त्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानातून संगणकावरील कळ दाबून राज्यभरात योजनेचा प्रारंभ करतील.

मक्तेदाराला मक्ता देण्याचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असले, तरीही योजेनचे उद्‌घाटन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पुढील आठवड्यात पंतप्रधान नरेद्र मोदी महाराष्ट्रातील कामांचा आढावा घेणार असून, जळगावच्या कामाला मंजुरी मिळून वर्षभर विलंब लागल्याबद्दलची माहितीही घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जळगासह महाराष्ट्रातील महापालिका व नगरपालिकांत अमृत योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी एकूण ८३७ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. याशिवाय राज्यातील १९ महापालिकांत नगरोत्थान प्रकल्पासाठी ७१५ कोटी रुपये, जेएमयूआयएम योजनेंतर्गत कामासाठी पाच महापालिकांना तीन हजार एकशे सात कोटी रुपये मंजूर केले आहेत.

मुंबईतून ‘ई’ भूमिपूजन 
महाराष्ट्रात एकाच दिवशी या कामाचा प्रारंभ होणार आहे. गुरुवारी (१३ एप्रिल) मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी सकाळी साडेदहाला या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस संगणकाची कळ दाबून ‘ई’ भूमिपूजन करणार आहेत. 

अल्पबचत भवनात कार्यक्रम
जळगावमधील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनातील नवीन सभागृहात हा कार्यक्रम होण्याची शक्‍यता आहे. या ठिकाणी थेट ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ची सुविधा आहे. मुंबईतून राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांतील एनआयसी सेंटरद्वारे त्याचे प्रसारण अल्पबचत भवनात होईल. 

मक्‍त्याचा अडथळा नाही
अमृत योजनेचा मक्ता देण्याबाबतचे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित आहे. त्यावर बुधवारी (१२ एप्रिल) सुनावणी होणार आहे. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेचा या उद्‌घाटनावर कोणताही परिणाम होणार नाही. केवळ योजनेचे भूमिपूजन होणार आहे. न्यायालय आदेश देईल त्याप्रमाणे मक्ता प्रक्रिया राबविण्यात येईल, असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले. 

सुनावणीस आयुक्तांची उपस्थिती
अमृत योजनेतील मक्‍त्याची ऑर्डर देण्याबाबत मुंबई उच्चन्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरू आहे. बुधवारी (१२ एप्रिल) यावर पुढील सुनावणी होणार असून, त्या दिवशी निकाल घोषित होण्याची शक्‍यता आहे. आयुक्त सोनवणे सुनावणीसाठी स्वतः न्यायालयात उपस्थित राहणार आहेत. 

अमृत योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार जळगावच्या कामाचे ‘ई’ भूमिपूजन होईल. त्यादृष्टीने प्रशासनातर्फे तयारी सुरू आहे.
- जीवन सोनवणे, आयुक्त, जळगाव महापालिका, जळगाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आढावा
देशभरातील अमृत योजनेच्या कामांचा आढावा पंतप्रधान मोदी घेणार आहेत. पुढील आठवड्यात ते यासंदर्भात माहिती घेणार आहेत.  त्यातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांत जळगावचे नाव आहे. जळगावच्या अमृत योजनेला अकरा महिन्यांपासून मंजुरी मिळूनही काम सुरू झालेले नाही. त्यामुळे त्याला विलंब का झाला, याची माहिती घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येते. जळगावच्या अमृत योजनेच्या कामाला २३ जून २०१६ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. त्यानंतर निविदेला तीनवेळा मुदतवाढ दिली. त्यानंतर निविदेचा ‘सेकंड’कॉल करण्यात आला. निविदा उघडल्यानंतर निवडणुकांची आचारसंहिता लागली. आचारसंहिता उठल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे कप्लायन्स करण्यास त्याला विलंब लागला. त्यामुळे पुढे मक्तेदारास काम देण्यास विलंब झाला त्यात पुढे मक्‍त्याची वर्कऑर्डर देण्याचे प्रकरण आता न्यायालयात प्रलंबित आहे. 

Web Title: road waterline amrut start