एका क्‍लिकवर ज्ञानाचे भांडार ! 

संतोष विंचू ः सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

येवला ः अध्ययन- अध्यापनासाठी गुरुजी एका क्‍लिकवर मोबाईलमधून ज्ञानाचे भांडार उघडू लागलेत. गुरुजींच्या खिशातील मोबाईलमध्ये शिक्षणाचे शंभरावर ऍप उपलब्ध झाले आहेत. विद्यार्थ्यांसाठी माहितीचा खजिना उपलब्ध होऊ लागल्याने शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी मदत होणार आहे. 

येवला ः अध्ययन- अध्यापनासाठी गुरुजी एका क्‍लिकवर मोबाईलमधून ज्ञानाचे भांडार उघडू लागलेत. गुरुजींच्या खिशातील मोबाईलमध्ये शिक्षणाचे शंभरावर ऍप उपलब्ध झाले आहेत. विद्यार्थ्यांसाठी माहितीचा खजिना उपलब्ध होऊ लागल्याने शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी मदत होणार आहे. 
राज्यात दोन लाखांवर शिक्षक तंत्रस्नेही आहेत. हजारांहून अधिक शाळा डिजीटल झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या संगतीने अध्यापन सहजगत्या करू लागलेत. मोबाईलच्या प्लेस्टोर मध्ये परिपाठ, निबंध, सूत्रसंचालन, भाषण इथंपासून पाठ्यपुस्तकांमधील धडे उपलब्ध झालेत. अख्खे पाठ्यपुस्तक, त्याचा सार, संदर्भ आणि व्हिडीओमुळे शिक्षणातील रंजकता वाढीस लागली आहे. सोशल मीडियामुळे मोबाईल बदनाम होत असताना शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्याची आशादायी किनार त्याला आहे. शिक्षकांनी स्वतःचे ब्लॉग सुरू केले असून सहकारी शिक्षकांसह विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान उपलब्ध करुन देत आहेत. कोणतीही माहिती कधीही- कुठेही सहज उपलब्ध होत आहे. वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रम, रूपरेषा, तयारी, उत्सव याबाबत मार्गदर्शनपर माहिती मिळते. शिक्षक ऍप्समुळे समृद्ध होत आहेत. गरज आहे ती नेमके आणि अचूक ऍप्स वापरण्याची. 

शैक्षणिक ऍप्स आणि माहिती 
उपलब्ध असलेले शैक्षणिक ऍप्स आणि त्यातून मिळणारी माहिती अशी ः जिओझेब्रा (ग्राफिंग कॅल्शि)-भौमितिक आकृत्या, आलेख. शिक्षणधारा-शिक्षकांचे दैनंदिन उपक्रम. संस्कारदीप -सूत्रसंचालन, भाषणे, दिनविशेष. परिपाठ- रोजचा आदर्श परिपाठ. दीक्षा-सरकारच्या सर्व भाषा-विषयांची माहिती. हॅलो इंग्लिश- इंग्रजी विषय समृद्धी. वर्ड अप-शिक्षकांसाठी महत्वाचे, इंग्रजी शब्द. एआयओ कॅल्शि- जिल्हा परिषद शिक्षकाने बनवलेले ऍप-वय, बीएमआय, वेतन, प्राप्तिकर, सर्व आकडेमोड. भाषा वाचन विकास-प्राथमिक शिक्षकाने बनवलेले वाचन शिकवणारे. एस टू जी एक्‍सेल एफएक्‍स-सर्व शालेय माहिती एक्‍सेलमध्ये. स्टेट बोर्ड बुक्‍स-सर्व वर्गांची पी. डी. एफ. पाठयपुस्तके. गुरुमाऊली-आदर्श सांस्कृतिक कार्यक्रमाचे साहित्य. गुगल ट्रान्सलेटर- इंग्रजी व इतर भाषांमध्ये भाषांतर करणे. पिंटरेस्ट- शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणारे, वैविध्यपूर्ण माहिती. झूम- शिक्षक संवाद. विकीपीडिया- सर्व भाषांमध्ये अद्यायावत माहिती. फोटोग्रीड- सर्व प्रकारच्या फोटोंचे कोलाज. काइनमास्टर- व्हिडिओ निर्मिती व लघुपट बनवणे. ब्लेंडकोलाज- फोटो कोलाज. प्ले बुक्‍स-पीडीएफ व ऑडिओ पुस्तके. पॅरलल स्पेस-एकावेळी दोन वेगळे अकौंट असलेले. जेईई मेन्स ऍडव्हान्स-जे ईई अभ्यासक्रम व नोट्‌स. ई- बालभारती- पाठ्यपुस्तके. मराठी भाषणे-प्रत्येक क्षेत्रातील भाषणे. एम. पी. एस. ई. टॉपर्स- स्पर्धा परीक्षांसाठी दैनंदिन घडामोडी. स्कॉलरशिप सराव- सराव प्रश्‍नपत्रिका. मराठी कीड्‌स बुक- विविध पुस्तके असलेले अनेक ऍप. भारताचा इतिहास- इतिहास. 

डिजिटल युगात शिकणे व शिकवणे सुलभ करणारे अनेक शैक्षणिक ऍप्स उपलब्ध होत आहेत. ऍप्सचा सकारात्मक आणि अभ्यासपूर्ण वापर शालेयस्तरावर झाल्यास निश्‍चितच दर्जेदार शिक्षण सर्वत्र मिळेल. मी स्वतः कोणताही वेगळे प्रशिक्षण न घेता, ऍपद्वारे अनेक बाबी शिकून समृद्ध होण्याचा प्रयत्न करत आहे. 
- शांतीनाथ वाघमोडे (पदवीधर शिक्षक, येवला) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Education