Live Photo
Live Photo

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरवात 

नाशिक ः देशात घनकचरा व्यवस्थापनासाठी ओला आणि सुका कचरा वेगळा करून जमा करावा यासाठी कायदा करत दंडात्मक कारवाई सुरु करावी लागली. तसेच घनकचऱ्याची समस्या ही मानवाच्या मानसिक अराजकातून निर्माण झालेली समस्या असून घनकचरा व्यवस्थापन जीवनशैलीचा भाग व्हावा. त्यातून खतनिर्मिती व पुनर्वापरातून घनकचरा भविष्यात आर्थिक व्यवस्थेचा भाग बनेल, असा विश्‍वास कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी आज येथे व्यक्त केला. 

किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातंर्गत वसुंधरा पुरस्कारांचे वितरण सोहळा एकलहरेच्या औष्णीक वीजनिर्मिती प्रकल्पात झाला. यावेळी श्री. कोकरे बोलत होते. मुख्य अभियंता उमाकांत निखारे अध्यक्षस्थानी होते. किर्लोस्करचे प्रकल्पाधिकारी मकरंद देवधर, वसुंधरा क्‍लबचे हेमंत बेळे, वीरेंद्र चित्राव, अमित टिल्लू, स्वप्नील राव आदी उपस्थित होते. पर्यावरणप्रेमी अनिल गायकवाड यांना वसुंधरा सन्मान आणि मिलींद पगारे व पत्रकार भावेश ब्राह्मणकर यांना वसुंधरा मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री. कोकरे म्हणाले, की कचऱ्याचे ढीग वाढत चालले आहेत. दुर्गंधी सोबत ढिगांना आग लागून हवा प्रदूषित होत आहे. घनकचरा धोकादायक आहे. "डंपिंग ग्राऊंड' मध्ये कचरा ठेवायचा नाही, हे धोरण मी जिथे काम केले, तिथं स्वीकारले आणि प्रकल्प बांधणी केली. संपूर्ण प्लास्टिक बंदी केली. कर्जत नगरपरिषदेला खतनिर्मितीसाठी कचरा विकत घेण्याइतपत प्रकल्प विकसित झाला. 
औष्णीक वीजनिर्मिती प्रकल्पात गेल्या दोन वर्षांपासून स्वच्छता आणि हरितकरणाचे काम सुरु आहे. वसाहतीतील एका कॉलनीतील तक्रारीनुसार उपायशोधताना काही ध्येय निश्‍चित केले. अगोदर स्वच्छता केली आणि मग सुंदरतेत भर घातली, असे श्री. निखारे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लास्टिक बंदीचा विषय मांडला असून गांधी जयंतीपासून देशात प्लास्टिक वापरावर बंदी होणार आहे आणि त्याचा वसुंधरा संस्था भाग असेल, असे श्री. चित्राव यांनी प्रास्ताविकात सांगितले. श्री. गायकवाड, श्री. पगारे, श्री. ब्राह्मणकर यांनी सत्काराला उत्तर दिले. लीना पाटील यांनी सूत्रसंचालन केले. राहूल बोरसे यांनी आभार मानले. 
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या "द वर्ल्डस्‌ मोस्ट फेमस टायगर' या नल्लामुत्थू दिग्दर्शित माहितीपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाची सुरुवात झाली. "मिडवे आयलॅंड', "ट्रान्सफॉर्मर ऑफ एनर्जी' चित्रपटांचे प्रदर्शन झाले. औष्णीक वीजनिर्मिती केंद्र वसाहतीतील मुलांनी तयार केलेल्या प्लास्टिक पुनर्वापर वस्तू प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. दुपारी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या समाजकार्य महाविद्यालयात छायाचित्रकार समीर बोंदार्डे यांची छायाचित्रण कार्यशाळा झाली. 

महोत्सवात आज अन्‌ उद्या 
बुधवार (ता. 28) ः कॉलेज रोडवरील धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन ऍण्ड टेकनॉलॉजी येथे प्लास्टिक प्रदूषणावर मात या विषयावर चर्चासत्र, विविध शाळा-महाविद्यालयात माहितीपट आणि लघुपटाचे प्रदर्शन 
गुरुवारी (ता. 29) ः नाशिकमध्ये "नो प्लास्टिक डे' पाळणार आणि स्वच्छता मोहिम 
.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com