पहिलवानांचे गाव फोफळेवाडी 

Live Photo
Live Photo

 नाशिक ः फोफळेवाडी (ता. दिंडोरी) हे चौदाशे लोकवस्तीचे गाव पहिलवानांचे म्हणून ओळखले जाते. फोफळेवाडी, पिंपळस, सूर्यगड अशा तीन गावांची गट ग्रामपंचायत आहे. फोफळेवाडीमध्ये व्यायामशाळा आहे; पण त्यात व्यायामाचे नाही साहित्य अन्‌ बाहेरगावचे बिऱ्हाड राहते. त्यामुळे तरुणांना सराव करता येत नाही. 
गावातील मल्लांनी नाव मिळविले. त्यात हिरामण बोके, बाळू बोके, (कै.) चंदर लिलके आदींचा समावेश आहे. कुस्तीच्या सरावासाठी जागा नसल्याने ज्येष्ठ मल्ल एकनाथ बोके यांनी स्वतःच्या घरात तालीम उभी केलीय. दहा बाय दहा फूट आकाराच्या खोलीत लाल माती टाकत व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून दिले. ते तरुणाईला कुस्तीचे धडे देतात. सार्वजनिक ठिकाणी पत्ते खेळून दिवस वाया घालवणाऱ्या युगात ज्येष्ठांकडून मल्ल तयार करण्यासाठी सुरू केलेला प्रयत्न वाखण्याजोगा आहे. सरकारी यंत्रणेकडून मदत मिळाल्यास अद्ययावत तालीम उभारून मल्ल घडविण्याचा मानस एकनाथ बोके यांचा आहे. तरुण पिढी वाया जात असल्याचे शल्य ग्रामस्थांमध्ये आहे. त्यावर उपाय म्हणून संस्कारवर्ग आणि रोजगाराची उपलब्धता होणे, हे ग्रामस्थांच्या दृष्टीने महत्त्वाचे झाले आहे. 
गट ग्रामपंचायतीची लोकसंख्या अडीच हजारांहून अधिक आहे. गावाजवळून कोलवण नदीची उपनदी वाहते. गावामध्ये हनुमानाचे मंदिर आहे. दरवर्षी हरिनाम सप्ताह होतो. यंदाच्या पुरामुळे भातशेतीचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच अतिवृष्टीमुळे अनेक घरे कोसळली आहेत. मात्र अद्याप पंचनामे झाले नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. गावाच्या विहिरीतून पिण्याचे पाणी गावात आणले आहे. उन्हाळ्यात मात्र पाण्याची मोठी अडचण भासते. त्यामुळे उन्हाळ्यात गावाजवळील पाझर तलावातील पाणी इतरांना न देण्याची भूमिका ग्रामस्थांनी स्वीकारली आहे. सुरेश पारधी हे गावचे कीर्तनकार. पूर्वी गावात बोहाडे होत असे. भजनी मंडळाच्या माध्यमातून कुसुम बोके, गंगू बोंबले, सुमन कडाळी, मीरा कडाळी, गोदाबाई कडाळी, तानाजी लिलके हे गायन करतात. 

गावात दवाखाना आहे. पण डॉक्‍टर मुक्कामी थांबत नसल्याने रुग्णांचे हाल होतात. तीन गावांतील या दवाखान्यात डॉक्‍टर मुक्कामी हवेत. तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी वाचनालयाची आवश्‍यकता आहे. वाचनालय सुरू झाल्याने तरुणाई चुकीच्या मार्गाला जाणार नाही. 
- हिरामण बोके, माजी सरपंच 
 
गावातील तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हायला हवी. त्यासाठी वाचनालयाची नितांत आवश्‍यकता आहे. तसेच जुनी घरे कोसळण्याच्या टप्प्यात पोचल्याने त्यावर उपाययोजना व्हावी. त्यातून अपघात टाळणे शक्‍य होईल. 
- कुसुम बोके, ग्रामस्थ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com