केवडीबनाच्या तिरडशेतमधील वृक्ष झालेत हद्दपार 

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

नाशिक ः आदिवासी बहोल तिरडशेतचे केवडीबन हे वैशिष्ट्य होते. काळाच्या ओघात वृक्षांची तोड झाली. इथल्या महिलांना पाण्यासाठी दुसऱ्या गावात जावे लागते. हनुमान जयंतीला होणारा यात्रोत्सव दोन वर्षांपासून बंद झालायं. 

नाशिक ः आदिवासी बहोल तिरडशेतचे केवडीबन हे वैशिष्ट्य होते. काळाच्या ओघात वृक्षांची तोड झाली. इथल्या महिलांना पाण्यासाठी दुसऱ्या गावात जावे लागते. हनुमान जयंतीला होणारा यात्रोत्सव दोन वर्षांपासून बंद झालायं. 
तिरडशेतमध्ये शिक्षण घेणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. नाशिक शहरालगत असलेल्या गावाचा समावेश महापालिका क्षेत्रात झाला नाही. ग्रामस्थ आमचे गाव आहे हे अनेकांना माहिती नसल्याची व्यथा मांडतात. हजारभर लोकवस्तीच्या गावात पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. ही शाळा साठ वर्षे जूनी आहे. पाचवीनंतरच्या शिक्षणासाठी इथल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावाचा रस्ता धरावा लागतो. पूर्वी त्रंबकेश्‍वरलाला जाण्यासाठी गावातून रस्ता होता. पण मार्ग गावापासून दोन किलोमीटर दूरवरुन गेला. रस्ता दूर गेल्याने गावाकडे पाह्यला कुणाला वेळ आहे की नाही? असा प्रश्‍न इथले आदिवासी उपस्थित करतात. गावात हनुमान, मरीआई, वेताळबाबा आणि म्हसोबा मंदिर आहे. 
बिगारी हे पोट भरण्याचे साधन आहे. तरुण पत्ते कुटण्यात मशगूल असतात ही व्यथा मांडत असतानाच ज्येष्ठांमध्ये तरुणाईमधील व्यसनाधिनता हा चिंतेचा विषय बनला आहे. गावातील विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने महिला रोज पिण्याचे पाणी पिंपळगाव बहुला गावातून आणतात. त्यासाठी दोन किलोमीटरचे अंतर रोज पार करावे लागते. गावात वाचनालय नाही कि व्यायामशाळा नाही. बॅंकेची शाखा नाही कि टपाल कार्यालय. काही जण पोलिस दल आणि अग्निशमन दलात दाखल झाले आहेत. गावात होळीचा सण हर्षोल्हासात साजरा होतो. मात्र इतर कोणतेही सार्वजनिक उत्सव होत नाहीत. गावातील शांताराम गांगुर्डे हे तलाठी झाले आहेत. गावाजवळून नंदिनी नदी वाहते. तसेच घरकुल योजना कागदवरुन प्रत्यक्षात साकारणार कधी? असा प्रश्‍न ग्रामस्थ उपस्थित करतात. गावात 80 टक्के आदिवासी असून देखील गाव "पेसा'मध्ये का नाही? याचे उत्तर इथल्या आदिवासींना अद्याप मिळालेले नाही. 

आमचा गाव अस्तिवहीन होण्याच्या उंबरठ्यावर पोचला आहे. गावाची प्रगती खुंटली आहे. कुणाचेही गावाकडे लक्ष नाही. पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सोडवायला कुणी तयार नाही. एक नागरिक म्हणून मला गावाला बदलताना पाह्यचे आहे. त्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत.'' 
- सारिका बोकड (उच्च शिक्षित विद्यार्थिनी) 
 

मी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. वडीलधारी मंडळी शिकलेली नसल्याने शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. आम्हाला गावाचा विकास हवा आहे. पारंपारिक उत्सव साजरे व्हावेत, असे मला वाटते.'' 
-पंडित वरघडे (विद्यार्थी) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Village