महाविद्यालयीन विद्यार्थ्याला भामट्याचा ऑनलाईन गंडा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

ओटीपी सांगितल्याने पावणे दोन लाखांवर पाणी 

नाशिक : बॅंकेतून अधिकारी बोलत असल्याची बतावणी करून, बॅंक, एटीएम-क्रेडिट कार्डची गोपनीय माहिती घेणाऱ्यांना ती माहिती देऊ नये, असे वारंवार पोलिसांकडून सांगितले जाते. त्याबाबत जनजागृतीही केली जाते. असे असतानाही एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अशाच एका भामट्याने तब्बल 1 लाख 85 हजार रुपयांची रक्कम काढून घेत ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांने घटना सांगितल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यातील साऱ्यांनीच कपाळाला हात मारून घेतला. 

प्रतिम सुनील भस्मे (19, रा. साहिल संकुल, श्रमिकनगर, सातपूर) या तरुणाच्या फिर्यादीनुसार, तो बीबीएच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेतो आहे. त्याच्या शिक्षणासाठी त्याचे पालकांनीच त्याच्या बॅंक खात्यावर पैसे ठेवलेले होते. दरम्यान, गेल्या 9 ऑगस्ट रोजी त्याच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञात संशयिताने फोन केला आणि बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून, बॅंक खात्यावर काहीतरी अडचण झाल्याची बतावणी केली आणि त्याच्याकडून बॅंक खात्याची माहिती, एटीएम कार्डची माहिती जाणून घेतली. त्यानंतर पुन्हा फोन करून संशयिताने प्रतिमच्या मोबाईलवर आलेल्याची ओटीपीची माहिती घेतली. त्यानंतर त्याने ऑनलाईन इंटरनेट ट्रान्झेक्‍शनच्या मदतीने प्रतिमचा मोबाईलच हॅक केला. त्यामुळे त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर येणारे ओटीपी त्यालाही समजू लागले. परिणामी संशयिताने प्रतिमच्या बॅंक खात्यातून 1 लाख 84 हजार 594 रुपये 17 पैसे काढून घेत ऑनलाईन गंडा घातला. 
सदरची बाब प्रतिम जेव्हा बॅंकेत गेला त्यावेळी त्याच्या बॅंक खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात आले. त्याने तात्काळ सायबर पोलीस ठाणे गाठले आणि घटना सांगितली. त्यावेळी सायबर पोलिसांनी डोक्‍यालाच हात लावून घेतला. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानेच असुशिक्षितासारखे काम केल्याने, पोलिसांकडून होणाऱ्या जनजागृतीच समाजापर्यत पोहोचत नाही का असे प्रश्‍न उभा राहिला. दरम्यान, याप्रकरणी सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे हे करीत आहेत. 

सायबर गुन्हेगारीबाबत वारंवार जनजागृती-प्रबोधनातून सांगितले जाते. ठिकठिकाणी भित्तीपत्रके लावून माहिती दिली जाते. शाळा-महाविद्यालयांमध्ये सत्र घेतले जातात. बॅंक वा एटीएम-क्रेडिट कार्डची कोणतीही माहिती मोबाईल फोनवर कोणालाही द्यायची नसते. बॅंकेला त्याची गरज नाही. तरीही अशी माहिती दिली जाते आणि फसवणूक होते. त्यानंतर उशिराने कळते आणि तोपर्यत संशयिताने पैसे काढलेले असतात. कोणत्याही कारणास्तव बॅंक डिटेल्स देऊ नये. 
- देवराज बोरसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, नाशिक. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik-cyber-crimenews