सिडकोत पूजा करण्याच्या बहाण्याने वृद्धासह महिलेस घातला गंडा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

नाशिक : सिडकोतील शिवाजी चौकात असलेल्या मंदिरात वृद्धाला पूजाचा बहाणा करून सोन्याची चैन व अंगठी लंपास केली तर याच संशयितांनी एका महिलेचेही दागिने अशारितीने लंपास केल्याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाशिक : सिडकोतील शिवाजी चौकात असलेल्या मंदिरात वृद्धाला पूजाचा बहाणा करून सोन्याची चैन व अंगठी लंपास केली तर याच संशयितांनी एका महिलेचेही दागिने अशारितीने लंपास केल्याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

उमाकांत मनोहर बोराडे (64, रा. शिवाजी चौक, जुने सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या सोमवारी (ता.7) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ते परिसरातून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून दोघे संशयितांनी त्यांना रोखले आणि उमाकांत यांना मंदिरात पुजारी कोण आहे, असे विचारले. त्यावेळी उमाकांत यांनी मंदिरात पुजारी नसल्याने सांगितल्याने दोघांनी उमाकांत यांना मंदिरात नेले. तेथे दोघांनी उमाकांत पूजा करण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून ठेवले. तसेच, त्यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व बोटातील अंगठी मागितली. ते दागिने संशयितांनी 100 रुपयांच्या नोटेत ठेवून त्याची पुडी केली. ती पुडी शंकराच्या पिडींला लावून उमाकांत यांच्याकडे दिली. तसेच ही पुडी दान करून टाका असे सांगून पिशवीत पुडी टाकून ती पिशवी उमाकांत यांना दिली. त्यानंतर संशयित निघून गेले. उमाकांत यांनी पुडी उघडून पाहिली असता, त्या पुडीत त्यांचे सोन्याचे दागिने नसल्याचे आढळून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उमाकांत यांनी अंबड पोलीस ठाणे गाठून फसवणूक झाल्याची तक्रार दिली. 
दरम्यान, मालन प्रदीप जगताप (रा. शुभम पार्क, उत्तमनगर) यांनाही याच प्रकारे गंडविल्याचा प्रकार घडला. संशयितांनी उमाकांत बोराडे, मालन जगताप यांच्याकडील 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करीत गंडा घातला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी शहरात पॉलिश करण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलांना गंडा घातल्याचे दोन-तीन प्रकार घडले होते. त्यामुळे बतावणी करून गंडा घालणारी टोळी शहरात सक्रिय झाली असून पोलीसांनी या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी होते आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik-froud-crimenews