अखेर सिव्हिलला मिळाले न्युरोसर्जन, कार्डियाक स्पेशालिस्ट

नरेश हाळणोर
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

गंभीर रुग्णांना मिळणार दिलासा : दीड वर्षांपासून होती प्रतिक्षा

गंभीर रुग्णांना मिळणार दिलासा : दीड वर्षांपासून होती प्रतिक्षा

नाशिक : नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयात अपघातांमध्ये डोक्‍याला गंभीर दुखापत झालेले रुग्ण वा हृदयविकाराच्या झटक्‍याने दाखल होणाऱ्या रुग्णांना तज्ज्ञ न्युरोसर्जन वा कार्डियाक डॉक्‍टरांअभावी खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत होती. मात्र आता अशा रुग्णांवरही जिल्हा रुग्णालयात उपचार होणार असून, स्पेशालिस्ट न्युरोसर्जन आणि कार्डियाक डॉक्‍टरांसह आणखी काही तज्ज्ञ डॉक्‍टरांची नियुक्ती आजच करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासूनच प्रतिक्षा संपली असून खऱ्यार्थाने रुग्णांच्या दृष्टिकोनातून जिल्हा रुग्णालयाचा कायापालट होतो आहे.

तीन वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयास कायाकल्प योजनेचा पहिल्यांदा प्रथम पुरस्कार मिळाला होता. तेव्हापासून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी तत्कालिन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे जिल्हा रुग्णालयासाठी न्युरोसर्जन, कार्डियाक स्पेशालिस्ट डॉक्‍टरांच्या भरतीसाठाची मागणी केली होती. डॉ. सावंत यांनीही त्यास मान्यता दिली होती. त्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पार पडून गेल्या वर्षभरात जिल्हा रुग्णालयामार्फत अनेकदा जाहिरात दिल्यानंतरही तज्ज्ञ डॉक्‍टर येण्याची अनुत्सुक दिसून येत होते. त्यामुळे दरम्यानच्या काळात ऑन कॉल डॉक्‍टर ही संकल्पनाही राबविण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यात यश आले नाही.
शेवटी, पुन्हा जाहिरातीमार्फत तज्ज्ञ डॉक्‍टरांना आवाहन केले असता, त्यास प्रतिसाद मिळाला आणि आज अखेर न्युरोसर्जन, कार्डियाक डॉक्‍टर्ससह आणखी काही तज्ज्ञ डॉक्‍टरांची आज (ता.4) नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भूलतज्‌ज्ञ-7, बालरोगतज्ज्ञ -4, स्त्रीरोगतज्ज्ञ 7, वैदयकीय अधिकारी 6, नेत्रविकारतज्ज्ञ 4 आणि फिजीओ 2 यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

हे आहे तज्ज्ञ
न्युरोसर्जन : डॉ. मुकुंदा चौधरी
कार्डियाक : डॉ. महेश आहेर
मायक्रो-बायोलॉजिस्ट : डॉ. प्रशांत गांगुर्डे
सर्जन : डॉ. गौरव पाटील (मनमानसाठी)
फिजिशियन : डॉ. पुष्कर इंगळे (मालेगावसाठी)

गेल्या काही महिन्यांपासूनची ही प्रक्रिया सुरू होती. आज अखेर त्यास यश आले आहे. त्यामुळे सिव्हिलमध्ये दाखल होणारे गंभीर अपघातग्रस्त रुग्ण आणि हृदयविकाराच्या रुग्णांवर याचठिकाणी उपचार करणे शक्‍य होणार आहे.
- डॉ. अनंत पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcivilhospitalnews