संतापलेल्या आरोपीने न्यायालयात भिरकावली चप्पल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

पत्नीवरील चाकू हल्ल्यात पतीला शिक्षा 

पत्नीवरील चाकू हल्ल्यात पतीला शिक्षा 

नाशिक : मुख्याध्यापक असलेल्या पत्नीवर शाळेच्या प्रवेशदवारावर चाकूने वार करीत जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपी पतीला जिल्हा न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, न्यायालयाने शिक्षा ठोठावताच आरोपीने कक्षात चप्पल भिरकावल्याचा प्रकार घडला. मधुकर खंडू मोरे (74, रा. भारतनगर, वडाळारोड) असे आरोपीचे नाव आहे. 
 
मधुकर खंडू मोरे (74, रा. भारतनगर, वडाळारोड) असे आरोपीचे नाव आहे. 27 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी वाजेच्या सुमारास उपनगरच्या पार्वतीबाई नगरमधील नायर प्राथमिक शाळेच्या प्रवेशद्वारावर घटना घडली होती. आरोपीच्या पत्नी तारा मोरे या आरोपीपासून विभक्त राहत होत्या. तर आरोपीने दरम्यानच्या काळात चार लग्न केली परंतु एकही पत्नी त्याच्यासोबत राहिली नाही. त्यामुळे गेल्या 15 वर्षात तारा मोरे यांनी आपल्यासाठी काहीच केले नाही, अशी कुरापत काढून त्याने 27 फेब्रुवारी रोजी शाळेच्या प्रवेशद्वारावरच तारा मोरे यांच्यावर चाकू हल्ला केला. चाकूने सपासप वार करीत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी उपनगर पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पोलीस उपनिरीक्षक संदीप कांबळे यांनी गुन्ह्याचा तपास करीत, जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. 
सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश एम.एस. बोधनकर यांच्यासमोर चालला. सरकारी पक्षातर्फे ऍड. सचिन गोरवाडकर यांनी 8 साक्षीदार तपासले. पुराव्यानिधी आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला 5 वर्ष सक्‍तमजुरी, 2 हजार रूपये दंड; दंड न भरल्यास दोन महिने शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार के.के. गायकवाड, आर.आर. जाधव, महिला शिपाई एम.एस. तेजाळे यांनी पाठपुरावा केला. 

आरोपीने भिरकावली चप्पल 
न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आरोपी मधुकर मोरे याने न्यायालयाच्या दिशेने चप्पल भिरकावली. सुदैवाने भिरकावलेली चप्पल कठड्याच्या अलीकडेच पडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांनी तात्काळ आरोपी मोरे यास ताब्यात घेतले. तर आरोपीने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सदरील घटनेची जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, याबाबत पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याशी संपर्क साधून अशा घटना न्यायालयात घडू नये यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcourtpunishmentcrimenews