Residential photo
Residential photo

सोनसाखळी चोरट्यांचा शहरात धुमाकूळ 

चार दिवसात पाच घटना : काळ्या रंगाची पल्सर रडारवर 
 
नाशिक : शहर परिसरामध्ये काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार दिवसात पाच घटनांमध्ये सुमारे साडेतीन लाखांचा सोन्याचा ऐवज बळजबरीने हिसकावून नेला आहे. गुरुवारी (ता.10) एकाच वेळी दोन तर तिसऱ्या घटनेत पत्ता विचारण्याचा बहाणा करीत वृद्धाच गळ्यातील सोन्याची चैन ओढून नेल्याचा प्रकार घडला आहे. ऐनसणासुदीच्या काळात सोनसाखळी ओरबाडणाऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. 

म्हसरुळ परिसरात गेल्या गुरुवारी (ता.10) सोनसाखळी ओढून नेल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. पहिली घटना दिंडोरी रोडवर सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. मधुकर पवार (रा. नर्मदा बंगला, श्री हरिकृपा सोसायटी, मेरी, दिंडोरीरोड) हे 72 वर्षीय वृध्द त्यांच्या बंगल्याच्या गेटसमोर त्यांची कार पुसत होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून दोघे संशयित आले. एकाने श्री. पवार यांच्याकडे पत्ता विचारण्याचा बहाणा केला आणि नेमकी संधी साधून त्यांच्या गळ्यातील 23 ग्रॅमची सोन्याची चैन बळजबरीने ओढून पोबारा केला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एन. भडीकर हे करीत आहेत. तर दुसरी घटना म्हसरुळ परिसरातील गीतानगरमध्ये रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली. मंजूषा मिलिंद देवकुटे (रा. धनेश्‍वर सोसायटी, जुन्या पेट्रोल पंपामागे, दिंडोरीरोड, म्हसरुळ) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता.10) रात्री पावणे नऊच्या सुमारास त्या त्यांच्या मुलीसमवेत गितानगरमधील सागर सुपर मार्केट येथे कपडे लॉन्ड्रीला देण्यासाठी पायी जात होत्या. त्यावेळी समोरून काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकी जोरात आली आणि त्यावरील दोघांपैकी एका संशयिताने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने ओढून वेगात पोबारा केला. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक माळी करीत असून दोन्ही गुन्हे म्हसरुळ पोलीसात दाखल करण्यात आले आहेत. 
सोनसाखळी चोरीची तिसरी घटना उपनगरच्या नारायणबापू नगरमध्ये गुरुवारी रात्री पावणे नऊच्याच सुमारास घडली. अनिता भूषण गवली (रा. रामनगर, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, रात्री जेवन झाल्यानंतर त्या अभिनव शाळेच्या पुढे पायी फिरत असताना, काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने ओढून वेगात पोबारा केला. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक लोंढे हे तपास करीत आहेत. 

पाच घटना; पोलिसांसमोर आव्हान 
गेल्या सोमवारी आणि मंगळवारी इंदिरानगर परिसरात सोनसाखळी खेचून नेण्याच्या सलग दोन घटना घडल्या होत्या. बुधवारी एकही घटना घडली नाही, मात्र गुरुवारी दिवसभरात तीन घटना घडल्या. यातील दोन घटना या म्हसरुळ हद्दीतील आहेत. या पाचही घटनांमध्ये सुमारे साडेतीन लाखांचा सोन्याचा ऐवज लुटून नेला आहे. तर, ऐनसणासुदीमध्ये सक्रिय झालेल्या सोनसाखळी चोरट्यांमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. दुसरीकडे महिलांमध्ये असुरक्षितता अन्‌ दहशतीचे वातावरण आहे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com