नाशिकमध्ये सोनसाखळी चोरट्यांचा अक्षरश: धुडगूस 

Residential photo
Residential photo


वृद्ध महिला टार्गेट : सहा घटनांमध्ये अडीच लाखांच्या सोनसाखळ्या ओरबाडल्या 
 
नाशिक : शहर पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये सोनसाखळी चोरट्यांनी सहा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर आज (ता.28) सकाळी अवघ्या 20 मिनिटांमध्ये भद्रकाली, पंचवटी आणि सरकारवाडा पोलिसांच्या हद्दीत तीन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोती ओरबाडून नेल्या. विशेषत: सध्या शहरात पोलिसांकडून हेल्मेट सक्तीसाठीची मोहीम सुरू असून त्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. असे असतानाही चोरट्यांनी शहराच्या मध्यवस्तीत येऊन सोनसाखळ्या ओरबाडून नेल्या आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न उभा राहिला आहे. तसेच, महिलांसाठीच्या "निर्भया' पथक फक्त समुपदेशन वा जनजागृतीसाठीच आहे का, असा उपरोधिक सवालही महिलांकडूनच उपस्थित केला जाऊ लागला आहे. 
 
सुरेखा राजेंद्र उपासणी (62) या आज (ता.28) सकाळी सात वाजेच्या सुमारास हिरावाडीतील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलासमोरील रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा हेल्मेटधारी चोरट्यांनी आजीबाईंच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने ओढली. मात्र सावध असलेल्या आजीबाईंनी पोत धरल्याने अर्धी पोत तुटल्याने काही त्यांच्या हाती तर काही संशयित चोरट्याच्या हाती गेली. या जबरी चोरीत 20 हजार रुपयांचे पोत चोरटयांनी ओढून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीसात गुन्हा दाखल आहे. 
त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांनीच संशयित सोनसाखळी चोरट्यांनी काठेगल्लीमध्ये पत्ता विचारण्याचा बहाणा करीत पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेली. शालिनी रघुनाथ सोनांबेकर (70) या नाविन्यनगरच्या रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी संशयितांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करीत, त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्याची सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी भद्रकाली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर 15 मिनिटांनी संशयित सोनसाखळी चोरट्यांनी गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन गार्डनच्या पाठीमागील रस्त्यावर पादचारी 55 वर्षीय 
मीनाक्षी शिवाजी आव्हाड यांच्या गळ्यातील 2 तोळ्याची सोन्याची पोत खेचून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल आहे. 
तसेच, शहरात मंगळवारीही (ता.27) तीन सोनसाखळ्या खेचून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. गंगापूर हद्दीतील सौभाग्यनगरमध्ये आशाबाई मोहन रणशूर (50, रा. केशवकुंज अपार्टमेंट, सौभाग्यनगर) या सोमवारी (ता.26) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मेडिकल दुकानात पायी जात असताना, दुचाकीवरून आलेल्या दोघा संशयित सोनसाखळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 70 हजार रुपयांचे 3 तोळ्याचे सोन्याचे गंठण बळजबरीने खेचून नेले. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल आहे. उपनगरच्या हद्दीमध्ये सुगराबाई सुपडू तडवी (76, रा. देवेन अपार्टमेंट, जगदीश सोसायटी, उपनगर) या मंगळवारी (ता.27) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास इमारतीसमोरील बाकावर बसलेल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ गेले आणि त्यांच्या गळ्यातील 34 हजार रुपयांची दीड तोळ्याची पोत बळजबरीने ओढून पोबारा केला. उपनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे. तर, चेतनानगरमध्ये गेल्या मंगळवारी (ता.27) नऊ वाजेच्या सुमारास नलिनी कुलकर्णी (71, रा. साईसमर्थ अपार्टमेंट, चेतनानगर, इंदिरानगर) या इमारतीजवळ असतानाच, दुचाकीवरून आलेल्या दोघा सोनसाखळी चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील 45 हजार रुपयांचे दीड तोळ्याची सोन्याची पोत खेचून पोबारा केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com