ऐनसणासुदीत शहरात महिलांची सुरक्षितता ऐरणीवर 

Residential photo
Residential photo

पोलिसांसमोर आव्हान : चैनस्नॅचिंग, विनयभंगाच्या प्रकारांमध्ये वाढ 

नाशिक : एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधुम तर दुसरीकडे ऐनसणासुदीचा काळ असताना, शहरातील महिलांमध्ये सोनसाखळी चोरट्यांनी दहशत पसरविली आहे. गेल्या 12 दिवसांमध्ये 10 सोनसाखळ्या हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या असून यातील एकाही गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. तर दुसरीकडे महिलांच्या विनयभंगाचे प्रकारही वाढले असून 10 गुन्हे दाखल आहे. त्यामुळे शहरातील महिलांची सुरक्षितताच ऐरणीवर आली असून पोलिसांच्या निष्क्रियेविरोधात तीव्र संताप व्यक्त होतो आहे. 

मोबाईलचे हेडफोन विकत घेण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या संशयिताने महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून पोबारा केल्याची घटना दिंडोरी रोडवर घडली. तर हिरावाडीत शतपावली करणाऱ्या महिलेचेही मंगळसूत्र सोनसाखळी चोरट्यांनी ओढून नेल्याची घटना घडली. दोन्ही घटना या शनिवारी (ता.12) सायंकाळनंतर घडल्या आहेत. 
मीना नवनीतलाल त्रिवेदी (55,रा. दिंडोरी रोड, म्हसरुळ) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे आरटीओ कॉर्नरवर श्री साई इलेक्‍ट्रॉनिक्‍स हे दुकान आहे. शनिवारी सायंकाळी त्या दुकानात असताना, सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोघे दुकानासमोर आले. पाठीमागे बसलेला संशयित दुचाकीवरून उतरून दुकानात आला आणि हेडफोन विकत घेण्याचा बहाणा करीत त्याने श्रीमती त्रिवेदी यांचे लक्ष विलचित करीत त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याची पोत बळजबरीने ओढून आटीओच्या दिशेने त्यांनी दुचाकीवरून पोबारा केला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक माळी तपास करीत आहेत. म्हसरुळ परिसरात गेल्या आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे. तर, हिरावाडीतील विधातेनगरमध्ये सुनंदा आंबेकर या जेवणानंतर घराबाहेरील रस्त्यावर शतपावली करीत होत्या. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांसमोर आव्हान; काळ्या रंगाची पल्सर 
ऐनसणासुदीमध्ये सोनसाखळी चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवडाभरात सोनसाखळी खेचण्याच्या पाच घटना घडल्या असून या पाचही घटनांमध्ये काळ्या रंगाची पल्सर दुचाकीचा वापर झाला आहे. तसेच, यातील तीन घटना या म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हददीत घडल्या आहेत. तर गेल्या 12 दिवसात इंदिरानगर-म्हसरुळमध्ये प्रत्येकी 3 तर, मुंबई नाका हद्दीतील दोन घटना या नवरात्रीतील आहेत. वाढत्या घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले असून शहरात पोलीस आहेत की नाहीत अशीच शंका घेतली जाऊ लागली आहे. पोलिसांची स्मार्ट नाकाबंदी कुचकामी ठरते आहे. 

विनयभंगाच्या प्रमाणात वाढ 
आडगाव आणि उपनगरमध्ये विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल झाले. माडसांगवी येथे पीडित विवाहिता ही कपडे वाळत घातल होती. त्यावेळी संशयित नितीन बाबुराव जाधव (40, रा. माडसांगवी) याने त्यांच्याशी वाद घालत मारहाण केली. तसेच, त्यांच्या अंगावरील वस्त्र फाडून लज्जास्पद कृत्य करीत विनयभंग केला. आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली आहे. तर, दुसऱ्या घटनेत संशयित विजय शहा (रा. रुंगटा इस्टेट, विटी रोड, गिरगाव, मुंबई) याने 2016 मध्ये कंपनीतील स्टील मटेरियल सप्लायर्सच्या वादातून पीडित महिला व त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर वारंवार फोन करन अश्‍लिल बोलून विनयभंग केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल केला. 

12 दिवसांतील गुन्हे 
चैनस्नॅचिंग : 10 
विनयभंग : 10 
विवाहितेचा छळ : 11 


पोलीस ठाणे निहाय 
पोलीस ठाणे         चैनस्नॅचिंग             विनयभंग 
उपनगर              1                            2 
मुंबई नाका          2                            1 
म्हसरुळ             3                            2 
ंपंचवटी            1                            0 
नाशिकरोड         0                             1 
इंदिरानगर         3                            1 
अंबड                 0                            1 
गंगापूर              0                           1 
आडगाव             0                            1 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com