कडकनाथ कोंबड्या फसवणुकीचे लोण नाशिकमध्येही 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

महारयत कंपनीने घातला कोट्यवधींचा गंडा : सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल 
 
नाशिक : पश्‍चिम महाराष्ट्रात कडकनाथ कोंबड्यांचे कुकुटपालन करण्याच्या नावाखाली महारयत ऍग्रो इंडिया कंपनीच्या संचालकांनी कोट्यवधींची फसवणूक केल्याचे लोण आता नाशिकमध्येही पोहोचले आहे. "कडकनाथ' फसवणूकप्रकरणी नाशिकमधील शेतकऱ्यांना 1 कोटी 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा पहिला गुन्हा सरकारवाडा पोलिसात दाखल झाला आहे. 

शिवदास भिकाजी साळुंखे (63, रा. सैय्यद पिंप्री, नाशिक) यांनी सरकारवाडा पोलीसात चौघांविरोधात फिर्याद दिली आहे. श्री. साळुंखे यांना, शहरात आयोजित कृषी प्रदर्शनात महारयत ऍग्रो कंपनीची कडकनाथ कोंबड्यांचे पालनविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी कॅनडा कॉर्नरवरील विराज टॉवर्समध्ये कंपनीच्या कार्यालयात जाऊन श्री.साळुंखे यांच्यासह ÷अन्य शेतकऱ्यांनी माहिती घेतली. संशयितांनी कंपनीत पैसे गुंतविल्यास कडकनाथ कोंबड्यांसह खाद्य व उपचार मोफत मिळतील. कोंबड्यांची वाढ झाल्यानंतर कंपनी त्या तिप्पट किमतीत विकत घेईल असे आमिष दाखविले. 
शेतकऱ्यांनी 1 लाख 20 हजार ते 10 लाखांहून अधिक पैसे यात गुंतविली. महिनाभर कंपनीतर्फे कोंबड्या, त्यांचे खाद्य व उपचार केले. मात्र नंतर कंपनीची सेवा बंद झाली. कंपनीने साळुंखे यांच्याकडील कोंबड्या नेताना, पंधरा दिवसांत पैसे देतो असे सांगितले. मात्र पैसे मिळालेच नाही. श्री.साळुंखे यांनी कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता, संपर्कही झाला नाही. साळुंखे यांच्याप्रमाणेच शेतकऱ्यांचीही फसवणूक झाल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच श्री. साळुंखे यांच्यासह सुमारे 30 ते 40 शेतकऱ्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून कंपनीचे प्रतिनिधी सुधीर शंकर मोहिते, हनुमंत शंकर जगदाळे, विजय शेंडे व संदीप सुभाष मोहिते (सर्व रा. इस्लामपुर, जि. सांगली) यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली. तर साळुंखे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची 13 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे, तर इतर शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार 1 कोटी 5 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. दरम्यान, महारयत कंपनीने पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुमारे 800 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikkadaknathcrimenews