घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेशदादा जैन रुग्णालयात 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 October 2019

नाशिक : बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज (ता.22) दुपारी नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मधुमेह, रक्तदाब आणि त्यांची बायबास शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तत्पूर्वी, कायदेशीर प्रक्रिया पार केल्यानंतरच त्यांना मध्यवर्ती कारागृहातून मुंबईला हलविण्यात येणार आहे. 

जळगाव घरकुल घोटाळाप्रकरणात निकाल देताना, धुळे विशेष न्यायालयाने 31 ऑगस्ट या खटल्यातील आरोपींना शिक्षा सुनावली होती. त्यात माजी मंत्री सुरेशदादा जैन हे मुख्य आरोपी आहेत. त्यानंतर त्यांना धुळे कारागृहातून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आज (ता.22) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सुरेशदादा जैन यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण 297 पर्यंत गेले, रक्तदाब वाढला आणि त्यांच्या छातीतही दुखू लागल्याने कारागृह रुग्णालयात तपासणी करून त्यांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. याठिकाणीही त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आले. यात त्यांचा रक्तदाब वाढलेला असून ते मधुमेहीचे रुग्ण आहेत. तसेच, त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झालेली असल्याने यासंदर्भात तज्ज्ञ पथक नाशिक जिल्हा रुग्णालयात नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील उपचारासाठी त्यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात हलविण्यात यावे असा निर्वाळा जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी दिला. 
त्यानुसार, सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांना कारागृहाच्या वाहनातून पुन्हा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना कारागृहाच्या रुग्णवाहिकेतून मुंबई नेले जाण्याची शक्‍यता आहे. 

मधुमेह, रक्तदाब आणि बायपास शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे त्यांना अधिक उपचारसाठी जे.जे. वा केईएम रुग्णालयात रवाना करण्यात यावे अशी सूचना कारागृह प्रशासनाला केली आहे. 
- डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय. 

कायदेशीर प्रक्रिया आणि जे.जे. रुग्णालयात हलविण्यासाठीची कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच त्यांना कारागृहाच्या रुग्णवाहिकेतून मुंबईत जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात येईल. 
- प्रमोद वाघ, कारागृह अधीक्षक, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik/sureshdadajain/crimenews