अंमलबजावणीपूर्वी वाहतूक शाखेकडून प्रबोधनात्मक जनजागृती सुरू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

नवीन मोटार वाहन कायदा : वाहनचालकांनी करावे वाहतूक नियमांचे पालन 

नवीन मोटार वाहन कायदा : वाहनचालकांनी करावे वाहतूक नियमांचे पालन 

नाशिक : केंद्र शासनाने पारित केलेला नवीन मोटार वाहन कायद्यांची गेल्या 1 सप्टेंबरपासून लागू करण्यात आला आहे. मात्र अद्याप महाराष्ट्रात या नवीन कायद्यांची शासनामार्फत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. असे असले तरी आज ना उद्या त्याची अंमलबजावणी होणारच असून त्यादृष्टिकोनातून वाहनचालकांनी आत्तापासून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, याकरिता नाशिक शहर वाहतूक पोलीस शाखेकडून वाहनचालकांचे प्रबोधनात्मक जनजागृती मोहीम राबविण्यात येते आहे. त्यासाठी वाहतूक शाखेकडून शहरभर नवी नियमांनुसार दंडाची व नियमांची माहिती असलेले फलक लावत असून शाळा-महाविद्यालयांमध्येही त्यासंदर्भात विशेष उपक्रम घेतले जात आहेत. 

वाढत्या रस्ता अपघातांना आळा बसावा, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे या उद्देशाने केंद्रशासनाकडून गेल्या काही वर्षांपासून नवीन मोटार वाहन कायदा आणणार, याबाबत चर्चा सुरू होती. अखेरिस सदरचा नवीन कायदा गेल्या 1 सप्टेंबरपासून लागू करण्यात आला आहे. परंतु सदरील कायदा राज्यांमध्ये लागू करण्यासंदर्भातील अधिकारी त्या-त्या राज्यांना बहाल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अद्याप सदरील नवीन मोटार वाहन कायदा लागू करण्यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. 
मात्र, आज, ना उद्या राज्यशासनाकडून नवीन मोटार वाहन कायद्याच अंमलबजावणीची अधिसूचना जारी होणारच आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांकडून त्यानुसार दंड वसुली केली जाणार आहे. यासंदर्भात नाशिक पोलीस वाहतूक शाखेकडून वाहनचालकांचे प्रबोधनात्मक जनजागृती सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी नवीन कायद्यानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणारा दंड, शिक्षा याबाबतची माहिती असलेले फलक लावले जात आहेत. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्यासह वाहतूक शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी, सहाय्यक आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी यांच्या वाहतूक शाखा व निर्भया पथकांकडून शाळा-महाविद्यालयांमध्ये उपक्रम घेण्यात येऊन नवीन मोटार वाहन कायद्याची माहिती दिली जात आहे. ज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास भरमसाठ आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहेच, शिवाय आता शिक्षाही दिली जाणार असल्याने, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन केले जात आहे. 

नवीन मोटार वाहन कायद्यांसंदर्भात राज्यशासनाकडून अद्याप अधिसूचना आलेली नाही. असे असले तरी त्या कायद्यासंदर्भात वाहनचालकांमध्ये प्रबोधनात्मक जनजागृती करीत आहोत. जेणेकरून वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करीत वाहन चालवावे. विनाकारण नियमांचे उल्लंघन करू नये. दंडाची रक्कम मोठी असल्याने वादाचे प्रसंगी उदभवण्याचीही शक्‍यता आहे. नियमांचे पालन केल्यास दंड भरण्याची वेळच येणार नाही. 
- पौर्णिमा चौघुले-श्रींगी, पोलीस उपायुक्त, शहर पोलीस वाहतूक शाखा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashiktrafficpolicenews