नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे शहरात पुर 

नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे शहरात पुर 

नाशिक, ता. 20- ऑगष्ट महिन्याच्या प्रारंभी शहर व परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार उडविल्यानंतर गोदावरी, नंदीनी नदीला महापुर येवून नागरी वसाहतींच्या भागात पाणी शिरल्याने या प्रकाराला नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे कारणीभुत ठरल्याचा आरोप नगरसेवकांनी केल्यानंतर नैसर्गिक नाल्यांच्या अतिक्रमणाचा अहवाल पुढील महासभेवर सादर करण्याच्या सुचना महापौर रंजना भानसी यांनी दिल्या. त्याशिवाय वाडे दुरुस्तीसाठी भाडेकरू मालकांना परवानगी देण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आल्याने वाडे दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या शिवाय गावठाणातील क्‍लस्टर विकासासंदर्भात शासन स्तरावर महापालिका प्रशासनाने पाठपुरावा करून लवकरात लवकर क्‍लस्टर योजना मंजुरीसाठी प्रयत्न करण्याच्या सुचना देण्यात आल्या. 
दोन आठवड्यांपुर्वी गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठचे भाग बाधित झाले होते. त्यावेळी आपतकालिन कक्षाला अधिकारी नसले तरी पालिकेच्या सर्वचं अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेवून जिवित व वित्त हानी टाळल्याच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस गटनेते शाहु खैरे यांनी अभिनंदनाचा प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाचे सर्वचं नगरसेवकांनी स्वागत केले. परंतू पुरस्थिती का निर्माण झाली याचे दाखले देखील नगरसेवकांनी दिले. विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करताना काही चुकीच्या बाबी घडल्याचे नमुद केले. डॉ. हेमलता पाटील व ऍड. शाम बडोदे यांनी नैसर्गिक नाल्यांचा मुद्दा पुढे केला. डॉ. पाटील यांनी नैसर्गिक नाल्यांवर बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमणे करतं पक्की बांधकामे केल्याचे नमुद केले तर ऍड. बडोदे यांनी इंदिरा नगर भागातील शिव कॉलनीच्या नाल्यावर हॉस्पिटल व ईमारतीचे बांधकाम झाल्याचे नमुद केले. एकंदरीत नैसर्गिक नाले बुजविली गेल्याने शहरात पुर आल्याचा आरोप करण्यात आल्याने शहरातील नैसर्गिक नाल्यांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. शशिकांत जाधव, अजिंक्‍य साने, वत्सला खैरे, संतोष गायकवाड, समिना मेमन आदींनी चर्चेत सहभाग घेतला. 
वाडे दुरुस्तीला हिरवा कंदील 
यंदाच्या पावसाळ्यात शहरात वीस हून अधिक वाडे कोसळले. धोकादायक वाडे उतरविण्यासाठी महापालिकेने मोहिम राबविली असली तरी वाडे दुरुस्तीसाठी परवानगी दिली जात नसल्याने धोके अधिक वाढल्याचे स्थायी समिती सभापती उध्दव निमसे यांनी सांगितले. त्यापार्श्‍वभूमीवर महापौर भानसी यांनी वाडे दुरुस्तीला नगररचना विभागाने परवानगी देण्याच्या सुचना दिल्या. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com