नगररचनाकार विभागाच्या लाचखोर लिपिकाला रंगेहाथ अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

नाशिक : पेट्रोल पंपासाठी असलेली जागा बिनशेती करण्यासाठीचा नाहरकत परवानगीसाठी 80 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मालेगावच्या नगररचनाकार विभागाच्या लाचखोर कनिष्ठ लिपिकाला रंगेहाथ अटक करण्यात आली. अनिल लक्ष्मण निकम (49) असे लाचखोराचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचवटी कारंजा बसस्थानकावर लाचेची रक्कम घेताना कारवाई केली आहे. दरम्यान, लाचखोर निकम याची हृदयाची शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. 

तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे पेट्रोल पंप मंजुर झाला आहे. त्यासाठी असलेल्या जागेचा बिनशेती करण्याकरीता मालेगाव येथील नगररचनाकार विकास योजना विशेष घटक या कार्यालयाकडे नाहरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. त्यासाठी गेल्या 8 ऑगस्ट रोजी तक्रारदाराने कनिष्ठ लिपिक अनिल निकम याची भेट घेतली असता, त्याने सदरची फाईल पूर्ण करण्यासाठी 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, पथकाने गेल्या 13 ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता त्यात तथ्य आढळून आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (ता.20) पंचवटी कारंजा परिसरात सापळा रचला. संशयित निकम हा आज दुपारी लाचेची रक्कम घेण्यासाठी आला आणि तक्रारदाराकडून 80 हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून असलेल्या पथकाने त्यास रंगेहाथ अटक केली. याप्रकरणी पंचवटी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित निकम याची हृदयाची शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्याने त्रास होण्याची तक्रार केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnewspolicetrap