शिवाजी चुंभळे यांची जामीनावर सुटका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांची अवैध मद्यसाठा प्रकरणात जिल्हा न्यायालयाने सशर्त जामीनावर सुटका केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चुंभळे यांना मंगळवारी (ता.20) रात्री मध्यवर्ती कारागृहातून अटक केली होती. दरम्यान, चुंभळे याच्या फार्महाऊसवर हाती लागलेल्या मद्यसाठ्यामध्ये सैन्यदलासाठीच असलेला विदेशी मद्याच्या 65 बाटल्या सापडल्या असता, सदरील मद्य आपल्याला गिफ्ट आल्याचे शिवाजी चुंभळे यांनी एक्‍साईजच्या चौकशीत सांगितले. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या शुक्रवारी (ता.16) 3 लाख रुपयांच्या लाचप्रकरणी अटक केल्यानंतर जिल्हा न्यायालयाने जामीन दिला होता. तर याचप्रकरणात छाप्यादरम्यान, त्यांच्या गौळाणे येथील फार्महाऊसवर 5 लाख 12 हजार 284 रुपयांचा अवैध विदेशी मद्यसाठा सापडला होता. यात 65 मद्याच्या बाटल्या या सैन्यदलासाठीच्या होत्या. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने न्यायालयाकडे शिवाजी चुंभळे यांच्या ताब्याची मागणी केली असता, त्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार, एक्‍साईजने चुंभळे यांना मंगळवारी (ता.20) रात्री मध्यवर्ती कारागृहातून अटक केली होती. 
आज (ता.21) चुंभळे यांना एक्‍साईजने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी.के. गावंडे यांच्यासमोर हजर केले. चुंभळे यांच्या कोठडीची मागणी केली असता न्यायालयाने ती फेटाळून लावली आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यावेळी बचावपक्षाने चुंभळे यांच्या जामीनासाठी अर्ज केला असता, तो सशर्त मंजूर करण्यात आला. त्यानुसार, शिवाजी चुंभळे यांना दर सोमवार व मंगळवारी एक्‍साईजच्या कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावावी लागणार आहे. तसेच, चौकशीसाठी जेव्हाही बोलविले जाईल त्यावेळीही त्यांनी हजर रहावे या अटीशर्थीवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सरकारी पक्षातर्फे ऍड. विद्या देवरे-निकम यांनी काम पाहिले. लाचप्रकरणातही शिवाजी चुंभळे यांना दर बुधवार व गुरुवारी चौकशीसाठी हजेरी लागणार आहे. 

म्हणे, त्या मद्याच्या बाटल्या गिफ्ट 
शिवाजी चुंभळे यांच्या निवासस्थानी सापडलेल्या मद्यसाठ्यामध्ये फक्त सैन्यदलासाठी असलेल्या ब्लॅक ऍण्ड व्हाईट या विदेशी मद्याच्या 65 बाटल्या सापडल्या आहेत. सदरील मद्य हे बाहेर विक्रीसाठी नसताना, ते चुंभळे यांच्याकडे कसे आले, याबाबतची विचारणा एक्‍साईजच्या चौकशी अधिकाऱ्यांनी केली असता, शिवाजी चुंभळे यांनी, त्या मद्याच्या बाटल्या या गिफ्ट आल्याचे सांगितले आहे. मात्र त्या बाटल्या कोणत्या सैन्य अधिकाऱ्यांनी गिफ्ट दिल्या वा इतक्‍या मोठ्याप्रमाणात त्या कशा गिफ्ट दिल्या याचे उत्तर येत्या काही दिवसात होणाऱ्या चौकशीतून समोर येण्याची शक्‍यता आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnewspolicetrap