दातर्तीत चार्टर्ड विमान कोसळले

दातर्ती (ता. साक्री) - शिवारात शुक्रवारी रात्री इमर्जन्सी क्रॅश लॅंडिंग करावे लागल्यानंतर झालेल्या अपघातात कोसळलेले बॉम्बे फ्लाइंग क्‍लबचे चार्टर्ड विमान.
दातर्ती (ता. साक्री) - शिवारात शुक्रवारी रात्री इमर्जन्सी क्रॅश लॅंडिंग करावे लागल्यानंतर झालेल्या अपघातात कोसळलेले बॉम्बे फ्लाइंग क्‍लबचे चार्टर्ड विमान.

साक्री/धुळे - गुजरातमधील सुरतहून धुळ्याकडे येणारे बॉम्बे फ्लाइंग क्‍लबचे चार्टर्ड विमान आज रात्री पावणेआठच्या सुमारास दातर्ती (ता. साक्री) गावानजीक कोसळले. त्यात कॅप्टनसह पाच ट्रेनी पायलट किरकोळ जखमी झाले असून, विमानाचेही मोठे नुकसान झाले.

गावाजवळ विमान कोसळल्याने झालेला मोठा आवाज व वीजपुरवठा खंडित झाल्याने दातर्तीचे ग्रामस्थ चांगलेच भयभीत झाले. विमान कोसळल्याचे कळाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने मदतकार्यात मोठे अडथळे येत होते.

बॉम्बे फ्लाइंग क्‍लबचे "व्हीटी बीसीए' हे चार्टर्ड विमान कॅप्टन जे. पी. शर्मा व प्रशिक्षणार्थी पायलट प्रीतमसिंग हे चालवत सुरत येथून गोंदूर (ता. धुळे) येथील विमानतळाकडे येत होते. आज रात्री पावणेआठच्या सुमारास विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विमान जवळच कोठे तरी उतरविणे गरजेचे झाल्याने कॅप्टन शर्मा यांनी दातर्ती गावानजीक मोकळी जागेचा अंदाज घेऊन इमर्जन्सी क्रॅश लॅंडिंग केले.

मात्र, विमान वीजतारांवर आल्याने त्याचा वेग कमी झाला. त्यामुळे ते खाली कोसळले. यात कॅप्टन शर्मा (वय 43), प्रशिक्षणार्थी पायलट प्रीतमसिंग (वय 30), प्रणवसिंग (वय 28), तेजस रवी (वय 30) अखिला ठाकलापती (वय 26) व अश्‍ना मोहंमद (वय 27) हे सहा जण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने विमान गावाबाहेर कोसळले व जवळ कोणीही नसल्यामुळे मोठी हानी टळली. अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले आहे.

आवाजाने ग्रामस्थ भयभीत
विमानाचे क्रॅश लॅंडिंग झाल्यानंतर व ते वीजतारांवर पडल्याने मोठा आवाज झाला. यावेळी गावातील वीजप्रवाहही खंडित झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले. यानंतर गावाजवळच विमान कोसळल्याचे कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.

अधिकारी एक तास उशिरा
विमान कोसळल्यानंतर पोलिस, महसूल व वीज वितरण कंपनीला माहिती देण्यात आली. मात्र, तरीही पोलिसांसह महसूलचे अधिकारी, रुग्णवाहिका घटना घडल्यानंतरही तब्बल एक तास उशिराने घटनास्थळी आले. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व नाराजी व्यक्‍त करण्यात आली. एक तासानंतर तहसीलदार संदीप भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश सोनवणे व पोलिस कर्मचारी दाखल झाले. मात्र, प्रचंड गर्दी झाल्याने मदतकार्याला अडथळे येत होते. वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही उशिरापर्यंत थांगपत्ता नव्हता.

मदतीऐवजी फोटो घेण्यात रस
घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. मात्र, अनेकांनी यावेळी मदतीऐवजी मोबाईल बाहेर काढत विमानाचे फोटो घेताना दिसून आले. काही अंधारातही विमानासोबत सेल्फी घेत होते, तर काही विमानावर चढलेले दिसून आले.

कॅप्टन शर्मा व पायलट प्रीतमसिंग या दोघांना जास्त मार लागला आहे. त्यांना साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com