राष्ट्रउभारणीसाठी हिंदूंनी जगण्यातील स्वार्थीपणा सोडावा - संभाजी भिडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

जळगाव - हिंदुस्थानवर आतापर्यंत 76 परकीय आक्रमणे झालीत. या लढाईत परकीयांना हिंदू सैनिकांनीच साथ दिली. त्याच बळावर ते यशस्वी झाले आहेत. या बदल्यात हिंदूंना केवळ सरदारकी आणि वतने मिळालीत. त्यामुळे आता हिंदूंनी जर स्वतःपुरती जगण्याची जात बाजूला केली तर खऱ्या अर्थाने राष्ट्र उभे राहील, असे स्पष्ट मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी जळगावात बोलताना व्यक्त केले.

सरदार पटेल लेवा भवनात आयोजित धर्मसभेत संभाजी भिडे बोलत होते. ते म्हणाले, हिंदुस्थान हा इराण, इराक, अफगाणिस्तान, बलुचिस्तानपर्यंत विशाल देश होता. मात्र या देशावर आक्रमण होत राहिले. त्यातच हा देश नष्ट झाला आहे. हिंदूंना कुणी कुणासाठी जगावं याची जाणीवच झालेली नाही. केवळ स्वतःपुरते जगावे हीच भावना त्यांच्यात आहे.

चीन, पाकिस्तान शत्रूच!
चीन हा आपला सर्वांत मोठा शत्रू आहे. परंतु आपण चायनीज फूड चवीने खातो, चायनाच्या वस्तू वापरतो, आपली संपूर्ण बाजारपेठ त्यांनी काबीज केली आहे. आपण चीनच्या वस्तू नाकारल्या पाहिजेत. हीच गोष्ट पाकिस्तानची आहे. हा देश आपल्यावर हल्ले करून सैनिकांना ठार मारतो, आणि आपण त्यांच्याशी क्रिकेट खेळतो, हे योग्य नाही.

रायगडावरून देशाचे राज्य
रायगडावर शिवराज्यभिषेकाच्या वेळी 32 मण सोन्याचे सिंहासन करण्यात आले होते. मात्र, मराठ्यांच्या ताब्यातून रायगड गेल्यावर शत्रूंनी ते सिंहासन तोडून टाकले. आता हे सिंहासन पुन्हा उभे करायचे आहे. त्यातून दिल्लीसह संपूर्ण देशात भगवा फडकणार आहे, रायगडाची हीच हिंदूशक्ती देशाचं नेतृत्व करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

सर्वधर्मसमभावावर टीका
सर्वधर्मसमभावावर त्यांनी सडकून टीका केली. रायगडावरील 32 मण सोन्याच्या सिंहासनाचा खडा पहारा राज्यातील युवक देणार आहेत. यासाठी हे युवक मावळ्यांच्या वेशात असतील त्यांच्याजवळ तलवारही असावी, परंतु त्यावर टीका होणार. सर्वधर्मसमभाव नष्ट होण्याची भीती व्यक्त होणार. खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभाव हा समाजातील बुजरेपणाच (हिजडेपणाच) आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.

विरोध झुगारत सभेस उदंड प्रतिसाद
संभाजी भिडे यांच्या सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी करीत भारिप बहुजन महासंघासह इतर संघटनांनी सभेला विरोध केला होता. त्यामुळे सभेस मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दंगाकाबू पथकाच्या जवानांसह साध्या वेशातील पोलिसही मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर अधीक्षक बच्चन सिंह, उपअधीक्षक सचिन सांगळेंसह मोठा ताफा सभेसाठी तैनात होता.

Web Title: sambhaji bhide speech hindu