संजय चव्हाणांचा महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव

baglan
baglan

सटाणा : बागलाण तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात कोसळलेले विजेचे खांब व तुटलेल्या तारा वीज वितरण कंपनीने अद्यापही दुरुस्त न केल्याने शेतशिवारात सध्या अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ काल सोमवारी (ता.२) माजी आमदार संजय चव्हाण व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व आदिवासी महिलांनी महावितरणच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता अनिल उईके यांना घेराव घालून ठिय्या आंदोलन छेडले. यावेळी आंदोलक कार्यालयाला कुलूप लावण्याच्या पवित्र्यात होते. मात्र येत्या ता.१० जुलैपर्यंत तालुक्यातील सर्व विद्युत खांब उभे करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन अधीक्षक अभियंत्यांशी दूरध्वनीवरून दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. 

गेल्या महिनाभरापूर्वी बागलाण तालुक्यात झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली होती. या वादळी पावसात सटाणा शहरासह मोसम, आरम व करंजाडी खोऱ्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील विजेचे खांब उन्मळून पडले. काही ठिकाणी विजेच्या तारा तुटून शेतात पडल्या. तर दोन खांबांमधील अंतर वाढल्याने ठिकठिकाणी तारा लोंबकळत आहेत. काही ठिकाणी ट्रान्सफार्मर्स नादुरुस्त झाल्याने शेतशिवारातील वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे नागरिकांसह जनावरांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने त्यांना इतरत्र भटकंती करावी लागते. 
काही गावांमध्ये बिबट्यांनी थैमान घातला असून वीजप्रवाह नसल्याने सायंकाळपासूनच दहशतीचे वातावरण पसरले आहे.

लहान मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेने शेतात राहणाऱ्या ग्रामस्थांचे व आदिवासी वस्तीवर असलेल्या रहिवाशांना खंडित वीजपुरवठ्यामुळे डोळ्यात तेल घालून जागरण करण्याची वेळ आली आहे. वीज वितरण कंपनीला शेतकरी व लोकप्रतिनिधींनी अनेकदा या प्रकाराबाबत सूचना देऊनही दखल घेतलेली नाही. त्यामुळे आज सायंकाळी पाच वाजता माजी आमदार संजय चव्हाण व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकरी व आदिवासी महिला येथील मालेगाव रोडवरील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात एकत्रित आले. यावेळी आंदोलक शेतकरी व महिलांनी अभियंता अनिल उईके यांना घेराव घालून ठिय्या दिला आणि खंडित वीजपुरवठ्याबाबत जाब विचारला. श्री. उईके हे उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पाहून माजी आमदार श्री. चव्हाण यांनी त्यांना धारेवर धरत कार्यालयाला कुलूप लावण्यास सरसावले. व तात्काळ अधीक्षक अभियंत्यांशी दूरध्वनीवरून उईके यांच्या अकार्यक्षमतेचा पाढा वाचला. त्यानंतर अधीक्षक अभियंता दरवडे यांनी येत्या १० जुलै पर्यंत सर्व कामे पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. 

आंदोलनात माजी नगरसेवक जे. डी. पवार, शिवा सोनवणे, सुभाष पाटील, अनिल सोनवणे, अशोक सोनवणे, वंदना सोनवणे, कलाबाई सोनवणे, विकी सोनवणे, सुनील सोनवणे, विलास सोनवणे, निंबाबाई बागुल, लताबाई पवार, आवळ्याबाई मोरे, आक्काबाई बोरसे, सरला माळी, जनाबाई पवार, इंदुबाई दळवी, अनिता माळी, लताबाई गांगुर्डे, सरला माळी, अंजना पवार, विमलबाई खैरनार, इंदुबाई गांगुर्डे, विजुबाई बोरसे, विमल पवार आदींसह शेतकरी व महिला सहभागी होत्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com