राष्ट्रीय मविप्र मॅरेथॉनमध्ये हैदराबादचा संजय कैरा विजेता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

एकूण सोळा गटात झालेल्या या स्पर्धेतून सुमारे पाच हजारहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला. मॅरेथॉन स्पर्धा जिंकण्यात मानसिक क्षमतेचा कस लागतो. त्यामुळे स्पर्धेत कामगिरी करणे आव्हानात्मक असते, असे मत अंजू बॉबी जॉर्ज हिने यावेळी व्यक्‍त केले.

नाशिक - मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे आयोजित चौथ्या राष्ट्रीय व नवव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन स्पर्धेत मुळचा उत्तराखंड येथील व हैदराबाद (गोळकोंडा) येथे कार्यरत सैन्यातील जवान संजय कैरा विजेता ठरला आहे. अर्ध मॅरेथॉनमध्ये पुरूष गटात नाशिकचे दामोदर हिराभाई तर महिला गटात नगरची धावपटू अर्चना कोहकडे यांनी बाजी मारली. जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेतील रौप्यपदक विजेती अंजू बॉबी जॉर्ज हिच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

सकाळी साडे सहाला मविप्र मॅरेथॉन स्पर्धेला सुरवात झाली. यावेळी अंजू बॉबी जॉर्ज हिच्यासह पोलिस आयुक्‍त रवींद्र सिंगल यांच्यासह अन्य मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेला सुरवात केली. याप्रसंगी मविप्र संस्थेच्या सरचिटणीस व मॅरेथॉन आयोजन समिती अध्यक्षा नीलिमा पवार, संस्थेचे सभापती ऍड. नितीन ठाकरे, अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांच्यासह पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.

एकूण सोळा गटात झालेल्या या स्पर्धेतून सुमारे पाच हजारहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला. मॅरेथॉन स्पर्धा जिंकण्यात मानसिक क्षमतेचा कस लागतो. त्यामुळे स्पर्धेत कामगिरी करणे आव्हानात्मक असते, असे मत अंजू बॉबी जॉर्ज हिने यावेळी व्यक्‍त केले. दरम्यान स्पर्धा मार्गावर ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी धावपटूंचे स्वागत केले. तसेच आपात्कालीन परीस्थितीसाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या होत्या.
प्रशिक्षणात व्यस्त असल्यामुळे मोनिका आथरे, संजीवनी जाधव यांच्यासह अन्य धावपटू बाहेरगावी असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत महिला गटातील अर्ध मॅरेथॉन स्पर्धेमध्ये नगरच्या धावपटूंनी बाजी मारली. नगरच्या अर्चना कोहकडे हिने प्रथम, निशा आगवे द्वितीय, तर जुजा राठोड हिने तिसरा क्रमांक पटकावला.

पुरूषांच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये संजय कैरा याने 2 तास 27.27 मिनीटे अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांकांचे 1 लाख रूपयांचे पारितोषिक पटकावले. तर पुणे डिगी कॅम्पमधील किशार गव्हाणे याने द्वितीय, उत्तराखंड येथील मुळचा व हैदराबाद येथील जवान धर्मेंद्र सिंह रावत याने तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

Web Title: Sanjay Kaira wins Nashik Marathon