महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या धुळे जिल्हा सरचिटणीसपदी संजय खैरनार

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 29 मार्च 2018

"गावांचा विकास हाच सरपंच संघटनेचा ध्यास असून जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाल्याने जबाबदारी अधिकच वाढली आहे. जिल्ह्यातील सर्व सरपंचांच्या समन्वयातून गावांच्या विकासासाठी कटिबद्ध राहू."
- संजय खैरनार, सरपंच, ग्रामपंचायत जैताणे, ता. साक्री जि. धुळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाची, राज्य कार्यकारिणीची बैठक आज गुरुवारी (ता. २९) सकाळी अकराला शिर्डी येथे संपन्न झाली. त्या बैठकीत धुळे जिल्हा सरपंच सेवा संघाच्या धुळे जिल्हा सरचिटणीसपदी माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील तरुण सरपंच संजय खैरनार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेचे राज्याध्यक्ष पुरूषोत्तम घोगरे, राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे, मार्गदर्शक नितीन उदमले, सुरेश कोते आदींच्या प्रमुख उपस्थितीत ही यशस्वी निवड झाली.

बैठकीस संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य, विभागीय अध्यक्ष, विभागीय सरचिटणीस, राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्हा महिला उपाध्यक्षा, जिल्हा सरचिटणीस आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचे नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस सरपंच संजय खैरनार यांच्यासह नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष तथा जुनवणेचे सरपंच दिपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते दौलत जाधव, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे, नवल खैरनार, सुरेश सोनवणे, ग्रामविकास अधिकारी आर.एन. कुवर आदीही याप्रसंगी उपस्थित होते. सरपंच श्री. खैरनार यांच्या यशस्वी निवडीबद्दल निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Web Title: sanjay kharinar dhule district sarpanch seva