'डीजे च्या आईचा असाही घो'

संतोष विंचू
रविवार, 26 ऑगस्ट 2018

डीजेचा आवाज म्हणजे आजूबाजूच्यांसाठी कर्दनकाळच.. किंबहुना या आवाजावर नियंत्रणासाठी पोलीस प्रशासन अनेक नियंत्रणे लावत असताना शौकिनांकडून मात्र त्यालाही न जुमानता डीजेचा सर्रास वापर होतोय. हा वापर किती धोक्याचा आणि नागरिकांच्या जीवावर बेतणारा ठरू शकतो याचे वास्तव चित्रण करणारा सुंदर लघुपट येथील संजीव सोनवणे यांनी साकारला आहे. डीजेच्या आईचा घो या नावाने हा लघुपट यु-ट्यूबवर लाईक घेत हिट ठरतोय.

येवला : डीजेचा आवाज म्हणजे आजूबाजूच्यांसाठी कर्दनकाळच.. किंबहुना या आवाजावर नियंत्रणासाठी पोलीस प्रशासन अनेक नियंत्रणे लावत असताना शौकिनांकडून मात्र त्यालाही न जुमानता डीजेचा सर्रास वापर होतोय. हा वापर किती धोक्याचा आणि नागरिकांच्या जीवावर बेतणारा ठरू शकतो याचे वास्तव चित्रण करणारा सुंदर लघुपट येथील संजीव सोनवणे यांनी साकारला आहे. डीजेच्या आईचा घो या नावाने हा लघुपट यु-ट्यूबवर लाईक घेत हिट ठरतोय.

गणेशोत्सवासह इतर कुठलाही सण किंवा लग्नकार्य असलं की डीजे आणि त्याचा निनादणारा आवाज हा ठरलेला आहे. पोलिस प्रशासन डेसिबल मोजण्यासाठी यंत्र हातात घेऊन बसते. परंतु, मंडळे व हौशी कार्यकर्ते त्यालाही दाद देत नाही. त्यामुळे जनप्रबोधन करण्यासाठी येथील हौशी छायाचित्रकार संजय सोनवणे यांच्या कल्पनेतून हा लघुपट साकारला गेला आहे. मागील दोन दिवसांतच यूट्यूबवर https://www.youtube.com/watch?v=jH-Bw2i_9Ls हा लघुपट अडीच हजाराहून अधिक नागरिकांनी पाहिला असून त्याला उस्फूर्त दाद दिली आहे. अनेकांनी तर त्यावर प्रतिक्रिया नोंदवल्या किंबहुना सोनवणे यांना मेल व व्हॉट्सअॅप करून देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

असे आहे कथानक...
घरात एकटी असलेली महिला तर बाहेर डीजेच्या जोरदार कर्णकर्कश आवाजात मिरवणूक सुरू आहे. यादरम्यान दोन चोरटे घराचा दरवाजा तोडताय हे लक्षात आल्याने ती पोलिसांना फोन करते पण तिचा आवाजच ऐकायला जात नाही. तर आपल्या पतीला पुन्हा पुन्हा मोबाइलवर फोन लावते. मात्र डीजेच्या आवाजात त्यांना मोबाइलचा आवाज पोहोचत नाही त्याच वेळी चोरटे घरात घुसून दागदागिने जबरदस्तीने लुटतात. त्यांना प्रतिकार करताना एकाच्या चेहऱ्यावरील कपडा पडतो अन ती त्याला ओळखते. यामुळे चोरटा तिचा खून करतो आणि पोबारा करतो. कितीतरी वेळाने घरी आलेल्या पतीच्या ही घटना निदर्शनात येते. मात्र डीजेच्या आवाजाने तिचा बळी घेतलेला असतो.

यांचे योगदान..
नम्रता फिल्मचीने हा लघुपट बनवला असून वंदना सोनवणे, संजीव सोनवणे यांनी दिगदर्शन केले आहे. तर, कलाकार म्हणून पल्लवी कदम, विपीन ज्ञानेसर, पोलिस निरीक्षक संजय पाटील, रविराज आंद्रे यांनी काम केले आहे. इतर सहकार्य महादेव गवळी, सुनील सरोदे, योगेश सोनवणे, मयूर सोनवणे, महेश कावले व येथील गणेश मित्र मंडळाचे आहे.

“डीजेमुळे असा प्रसंग आपल्या घरी पण होऊ शकतो? त्यामुळे गणेशोत्सव डीजेच्या आवाजात नव्हे तर टाळ मृदुगाच्या आणि ढोल ताश्याच्या गजरात आनंदात करावा. डीजेचे तोटे कळावे म्हणून एक प्रबोधन करण्यासाठी हा लघुपट बनवला आहे.पुण्या-मुंबईपासून अनेकांनी याचे स्वागत करून अनुकरणीय असल्याचे म्हटले आहे.”संजीव सोनवणे, दिगदर्शक, येवला

Web Title: sanju sonawanes film hit on Youtube