"मुन्नाभाई'चा "सर्किट' मित्रही अटकेत 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 जून 2018

"मुन्नाभाई'चा "सर्किट' मित्रही अटकेत 

"मुन्नाभाई'चा "सर्किट' मित्रही अटकेत 

जळगाव : जिल्हा पोलिसदलाच्या भरतीसाठी दंडावर मायक्रोचीप व कानात इअरफोन लावून "मुन्नाबाई एमबीबीएस' स्टाइल लेखी परीक्षेला आलेल्या उमेदवाराला 19 एप्रिलला कॉपी करण्यापूर्वीच अटक करण्यात आली होती. त्याला या इअर फोनवर प्रश्‍नांची उत्तरे देणाऱ्या त्याच्या "सर्किट' मित्राला दोन महिन्यांच्या अथक परिश्रमाअंती गुन्हेशाखेच्या पथकाने औरंगाबाद येथून आज ताब्यात घेतले. अटकेतील संशयित हा सहा वर्षे भारतीय सैन्यात कार्यरत होता. मात्र नंतर नोकरी सोडल्याची माहिती पथकाकडून मिळाली. 
जिल्हा पोलिसदलातर्फे 112 रिक्त जागांसाठी मार्च-एप्रिल महिन्यात भरती प्रक्रिया राबवली गेली. मैदानी चाचणीनंतर 19 एप्रिलला लेखी परीक्षेसाठी आलेला मदन महाजन डेडवाल (वय-21, जोडवाडी, औरंगाबाद) हा मेटल डिटेक्‍टरमधून शिरताच बीप वाल्याने पकडला गेला. त्याच्या दंडावर मोबाईल इन्ट्यूमेंट काळ्या चिकटपट्टीने चिकटविण्यात आल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी डेडवाल याला पकडून हे साहित्य जप्त केल्यावर या यंत्राद्वारे तो रतन प्रेमसिंग बहुरे (वय-30, रा.जोडवाडी, कचनेर, औरंगाबाद) याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले होते. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिस त्याचा शोध घेत असताना गुन्हेशाखेचे निरीक्षक सुनील कुराडे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक रवींद्र बागूल, रवींद्र पाटील, विकास वाघ, विनोद पाटील, प्रकाश महाजन, गफूर तडवी, अशरफ शेख, प्रवीण हिवराळे, सतीश गवळी, दत्तात्र्यय बडगुजर यांच्या पथकाने जोडवाडी, औरंगाबाद येथून रतनसिंग बहुरे यास ताब्यात घेत अटक केली आहे. 

माजी सैनिक 
अटक करण्यात आलेला तरुण रतनसिंग बहुरे हा काही वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात कार्यरत होता. मात्र त्याने नोकरी सोडली असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही पोलिस भरतीत गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाले असून, यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात आणि बुलडाणा येथे ही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याची माहिती हाती आली आहे. 

Web Title: sarkit