कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरपंच महिलेने मंगळसूत्र ठेवले गहाण

कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरपंच महिलेने मंगळसूत्र ठेवले गहाण

एकलहरे - कुटुंबासाठी किंवा शौचालयासाठी महिलेने दागिने गहाण किंवा विकल्याचे आपण वाचले किंवा दूरचित्रवाणीच्या अनेक वाहिन्यांवर बघितलेदेखील आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नाशिक तालुक्‍यात अव्वल दर्जाची ग्रामपंचायत असा नावलौकिक असलेली निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त व विविध विकासकामांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या एकलहरेच्या सरपंच मोहिनी जाधव यांना आपल्या मंगळसूत्रासह इतर दागिने गहाण ठेवावे लागले आहेत. कारण त्या कर्मचाऱ्यांची दिवाळीही कडू होऊ नये यासाठी...

एकलहरे ग्रामपंचायतीस महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कारखान्याची कलम १२५ नुसार ठोक अंशदानरूपी घरपट्टी दर वर्षी एप्रिलच्या अखेरपर्यंत जमा होत असे. महाराष्ट्र शासनाने कलम १२५ रद्द करून कलम १२४ नुसार रेडिरेकनरच्या दराने घरपट्टी वसूल करण्याचे आदेश दिल्यानंतर त्यानुसार आर्थिकदृष्ट्या वीजनिर्मिती कंपनीला घरपट्टीची आकारणी करून बिल बजाविण्यात आले. वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा घरपट्टीतून सूट मिळावी, हे कारण पुढे करून वीजनिर्मिती प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती खालावून तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याने व ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळवण्याचे अतिरिक्त साधन नसल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. 

प्रशासकीय खर्च, छोट्या-छोट्या विकासकामांची बिलदेयके रखडल्याने ग्रामपंचायतीचा कारभार चालवणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे. त्यात दिवाळीसारखा मोठा सण असल्याने ज्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर ग्रामपंचायतीचा कारभार चालतो, त्यांची व त्यांच्या कुटुंबाची दिवाळी चांगली व्हावी, या उद्देशाने सरपंच मोहिनी जाधव यांनी स्वत:च्या मंगळसूत्रासह इतर दागिने गहाण ठेवत आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचे ठरविले. आपल्या निर्णयासंदर्भात सासरे दिलीप जाधव व पती संदीप जाधव यांना सांगितले. त्यांनी आनंदाने संमती देत त्यांच्या कुटुंबातील आनंद हीच आपली दिवाळी असल्याचे सांगितले. सौ. जाधव यांनी मंगळसूत्रासह दागिने बॅंकेकडे गहाण ठेवत एक लाख ७५ हजार रुपये घेतले. त्याचा धनादेश ग्रामसेवक भाऊसाहेब वाघ यांच्याकडे सुपूर्द करीत त्वरित कर्मचाऱ्यांचा पगार अदा करण्याचे सूचित केले. 

ग्रामपंचायतीमध्ये काम करताना करातून मिळणारे उत्पन्न महत्त्वाचे असते. एकलहरे ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीद्वारे करण्यात येणारा करभरणा हा महत्त्वपूर्ण वाटा होता. परंतु आजतागायत मिळालेला नाही. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी करभरणा करण्याचे आदेश देऊनसुद्धा प्रशासन करभरणा करण्यास टाळाटाळ करीत आहे. रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात होऊ नये, यासाठी मी हा निर्णय घेतला.
- मोहिनी जाधव, सरपंच, ग्रामपंचायत, एकलहरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com