गावांना टँकर सुरु करण्याचे अधिकार तहसीलदारांकडे द्यावेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

सटाणा - टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना असलेले अधिकार तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात यावे, या मागणीसाठी बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची काल मंगळवार (ता.२७) रोजी मुंबई येथे भेट घेऊन चर्चा केली आणि निवेदन दिले.

आज विधानभवनात आमदार सौ.चव्हाण यांनी मुख्यमंत्री फडवणीस यांची भेट घेऊन या गंभीर प्रश्नावर चर्चा केली. यावेळी दिलेल्या निवेदनात, महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सध्या पाणी टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होत आहे. गेल्या वर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे एप्रिल व मे महिन्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. 

बागलाण विधानसभा मतदारसंघात या वर्षी जानेवारी महिन्यातच पाण्याची भयावह परिस्थिती तयार झाली असून, फेब्रुवारी महिन्यातच पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु झाले आहेत. अनेक गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागल्यामुळे टँकरने पाणीपुरवठा सुरु करावा अशी मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. टँकर सुरु करण्याबाबतचे सर्व अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना असल्याने टंचाईग्रस्त गावांमध्ये प्रत्यक्ष टँकर सुरु होण्यास बराच कालावधी लागतो. पंचायत समिती, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचेकडून टँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले जातात. यासाठी दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे जनतेमध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधींबद्दल नाराजी वाढते. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर सुरु करण्याचे अधिकार तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात यावे अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. 

या प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही आमदार सौ.चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Web Title: satana north maharashtra water crisis water tanker