आई, मला शाळेला जाऊ देन वं!

दीपक खैरनार
बुधवार, 5 जून 2019

अंबासन फाट्यावर वाहन तपासणी मोहीम सुरू असताना मेंढपाळ अण्णा गोवेकर यांचा नातू सचिनच्या हट्टाबाबत माहिती मिळाली. त्यांना मार्गदर्शनाचा अभाव वाटला अन्‌ स्वतःच लक्ष घालून सचिनच्या भविष्यासाठी मदतीचा हात दिला.
- रविराज बच्छाव, वाहतूक पोलिस, जायखेडा

निरक्षर कुटुंबातील सचिनला पोलिस अन्‌ शिक्षकामुळे शाळाप्रवेश
अंबासन - काय सांगावं राव! बापडं शाळीत नाव घालाया पोरांना घेऊन जाताना पाहताच पोरगंही बिथरलंय. आईकडं सारखं किरकिर करत असल्याचे पिढ्यान्‌ पिढ्या शेतकऱ्यांकडे वाघूर घालण्यात आयुष्य गेलेल्या अण्णा पिरा गोवेकर यांनी सांगताच शिक्षकासह पोलिस कर्मचारीही मदतीला आल्याने आईकडे शाळेत जाऊ देण्याचा हट्ट धरणाऱ्या सचिनच्या चेहऱ्यावर हास्य फुटले.

सचिनचा हट्ट पुरविण्यासाठी वाहतूक पोलिस रविराज बच्छाव व आदर्श शिक्षक सुनील कापडणीस धावून आले. फोपीर (ता. बागलाण) येथील गोवेकर कुटुंबीय मेंढ्या चारणे व शेतात वाघूर घालणे हा वडिलोपार्जित व्यवसाय गेल्या शंभराहून अधिक वर्षांपासून गाव सोडून करीत आहेत. जमीन नाही, घर नाही. वाघूर घातले तेच आपले शेत अन्‌ घर, असे गोवेकर सांगतात. गोवेकर कुटुंबीयांत एकही जण शाळेत गेला नसल्याने सर्वच अशिक्षित आहेत. सध्या नवगतांची शाळेत प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्याने अण्णा गोवेकर यांचा नातू सचिनलाही शाळेचा लळा लागला आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून सारखं आई व आजोबांकडे शाळेत प्रवेशासाठी तो लाडीगोडी लावत आहे. मात्र, कुटुंबीयांना शाळेविषयी कुठलीही कल्पना नसल्याने ते चिंतेत पडले होते. अशात जायखेडा पोलिस ठाण्यातील वाहतूक पोलिस रविराज बच्छाव यांना याबाबत कळताच, त्यांनी थेट वाघूर बसलेल्या शेतात पोचत सचिनला शाळेत प्रवेशासाठी मदतीची ग्वाही दिली. नाराज सचिनचा चेहरा खुलला.  बच्छाव यांनी लागलीच अंबासन येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुनील कापडणीस यांची भेट घेऊन सचिनची माहिती दिली. कापडणीस यांनीही सहकार्य करीत शाळेतील पहिला प्रवेश सचिनचाच, असे सांगत प्रवेश अर्जही भरून घेतला. बच्छाव यांनी स्वखर्चाने बाजारातून सचिनला दप्तर, वह्या, कंपास व इतर वस्तू खरेदी करून दिल्या. दोन्ही कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सचिनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांना शाळेविषयी कुठलीही माहिती नसल्याचे दिसत होते. सचिनचा शाळेतील पहिलाच प्रवेश घेण्यासाठी जबाबदारी घेतली असून, पुढेही मदत केली जाईल.
- सुनील कापडणीस, शिक्षक जिल्हा परिषद, अंबासन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School Education Police Student Admission Sachin Govekar