
नियमित वेळेवर शाळेत हजर व्हावेत, यासाठी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी ही शक्कल लढविली आहे
तळोदा: दुर्गम व विखुरलेला भाग असला तरी शिकण्याची व शिकविण्याची ओढ असली म्हणजे सारे काही शक्य होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे विहिरीमाळ शाळा. परिसरातील प्रत्येक मुलाने वेळेत शाळेत यावे व शिकावे यासाठी सातपुड्याच्या दुर्गम भागाच्या शाळेतील शिक्षकांनी एक अनोखी शक्कल लढविली आहे. परिसरातील दोन उंच टेकड्यांवर घंटा वाजवीत विद्यार्थ्यांना शाळा भरल्याचा संदेश देण्यात येत असून, विद्यार्थीही शिक्षकांच्या संकल्पनेला उत्तम प्रतिसाद देत शाळेत वेळेवर व नियमित हजेरी लावत आहेत.
आर्वजून वाचा- संतापजनक..आवाज देवूनही ना डॉक्टर आले ना कर्मचारी; शेवटी रिक्षातच झाली प्रसुती
विहिरीमाळ (ता. तळोदा) हे गाव अत्यंत दुर्गम भागात असून, गाव तीन-पाच किलोमीटर अंतरात विखुरलेले आहे. येथील नागरिक मेहनत करून जेमतेम पोट भरतात. गरिबीच्या परिस्थितीमुळे मोजक्याच लोकांकडे वेळ बघण्यासाठी घड्याळ, टीव्ही अथवा इतर उपकरणे उपलब्ध आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना शाळेची वेळ कळावी, ते नियमित वेळेवर शाळेत हजर व्हावेत, यासाठी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी ही शक्कल लढविली आहे. शाळेची वेळ झाल्यावर परिसरातील दोन टेकड्यांवर घंटा वाजविण्यात येते. घंटा वाजली की परिसरातील विद्यार्थ्यांना शाळा भरल्याचा संदेश मिळतो. त्यानंतर गावातील मुले दोन किलोमीटरची पायपीट करीत शाळेत हजर होतात.
कुडाच्या खोलीत भरते शाळा
विहिरीमाळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून, शाळा कुडापासून बनलेल्या खोल्यांमध्ये भरते. कोरोना पार्श्वभूमीवर सध्या फक्त पाचवीचा वर्ग भरत आहे. शिक्षकांना शाळेत येण्या-जाण्यासाठी पूर्ण डोंगर पायपीट करावी लागते. रस्त्याच्या आजूबाजूला दरी असून, थोडासा जरी पाय घसरला तरी दरीत पडण्याची शक्यता आहे. मात्र अशाही परिस्थितीत शिक्षक गिम्बा राहसे व रवींद्र पावरा मुलांना शिकविण्यासाठी येतात. शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, केंद्रप्रमुख रंजना निकुंभे यांचे मार्गदर्शन लाभत असून, ग्यानप्रकाश फाउंडेशनचे गणेश वसावे, क्रांती सोनवणे व शिक्षण मित्र सरिता वळवी, रमेश वळवी, मुकेश वळवी आदींचे सहकार्य मिळत आहे.
वाचा- ‘बर्ड फ्लू’बाबत दक्षता..जळगाव जिल्ह्यातही पोल्ट्री फॉर्ममध्ये तपासणी
विहिरीमाळ येथील शाळा दुर्गम भागातील असूनही शाळेतील दोन विद्यार्थी डॉक्टर व दोन विद्यार्थी इंजिनिअर झाले आहेत. शाळेच्या परिसरातील मुलांना नियमितपणे शिक्षण मिळावे यासाठी शाळेतील दोन्ही शिक्षक खूप मेहनत घेतात याचा सार्थ अभिमान आहे.
-रंजना निकुंभे, केंद्रप्रमुख, प्रतापपूरकोरोनाकाळात आम्ही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी आमच्या शाळेतील शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. आता शाळा सुरू झाली त्याचा मनस्वी आनंद होत आहे. आम्ही शाळेत वेळेवर पोचावे यासाठी टेकडीवर घंटा वाजते, ती ऐकू आल्यावर मी शाळेत जाते.
-रतिला वळवी, विद्यार्थिनी, विहिरीमाळ शाळा
संपादन- भूषण श्रीखंडे