शाळांमधील स्वच्छतेची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

धुळे - स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत महापालिकेच्या पथकाने आज सकाळी शहरातील तीन शाळांची पाहणी करत स्वच्छतेचा आढावा घेतला. स्वच्छतेच्या अनुषंगाने आढळलेल्या त्रुटी दूर करण्याच्या सूचनाही पथकाने संबंधित शाळांना केल्या.

धुळे - स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत महापालिकेच्या पथकाने आज सकाळी शहरातील तीन शाळांची पाहणी करत स्वच्छतेचा आढावा घेतला. स्वच्छतेच्या अनुषंगाने आढळलेल्या त्रुटी दूर करण्याच्या सूचनाही पथकाने संबंधित शाळांना केल्या.

स्वच्छ सर्वेक्षण २०१७ अंतर्गत महापालिकेच्या माध्यमातून विविध पातळीवर काम सुरू आहे. शहराची स्वच्छता व हागणदारी मुक्तीसाठीच्या प्रयत्नांचा यात समावेश आहे. याच उपक्रमांमध्ये महापालिका शाळांसह खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शौचालयांची व्यवस्था, शाळांतील वर्गखोल्या, परिसराची स्वच्छता चांगली असावी, यासाठी प्रयत्न होत आहेत. या संदर्भात शाळांना यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. शाळांतील स्वच्छतेसंदर्भात आढावा घेण्यासाठी नव्यानेच रुजू झालेले सहाय्यक आयुक्त अनुप दुरे यांच्या नेतृत्वात महापालिकेने पथकही नेमले आहे. अनिल साळुंके, शिक्षण मंडळाचे ए. बी. जाधव, एस. बी. देसले यांचा या पथकात समावेश आहे. 

या पथकाने आज सकाळी दहा-साडेदहाला महापालिका फुले कॉलनीतील शाळा क्रमांक ३ व गरुड प्रायमरी स्कूल तसेच गल्ली क्रमांक पाचमधील महापालिका शाळा क्रमांक नऊमध्ये पाहणी केली. या शाळांमधील शौचालये, वर्गखोल्या, शाळा परिसरातील स्वच्छतेची पथकाने पाहणी केली. ज्या ठिकाणी अस्वच्छता दिसून आली त्यात सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित शाळांतील शिक्षकांना देण्यात आल्या. पाहणी करताना ‘जिओ टॅग’ फोटोही काढण्यात आले. या शाळांची पुन्हा पाहणी करण्यात येणार आहे.

अन्यथा कारवाई
शाळांच्या स्वच्छतेसाठी नेमलेले पथक सोमवारपासून (ता. १६) शहरातील कोणत्याही शाळेत भेट देऊन शाळांमधील शौचालये, वर्गखोल्या, शाळा परिसराची पाहणी करणार आहे. या पाहणीत अस्वच्छता दिसून आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: School sanitation inspection