दप्तराचे ओझे ‘जैसे थे’ (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

ओझे कमी केलेल्या उपाययोजना
शाळेत बसवली शुद्ध पाण्याची यंत्रणा
काही शाळांमध्ये कॅन्टीनची सुविधा
पाठ्यपुस्तकांचे केले वजन कमी
शाळांमध्ये वह्या-पुस्तके ठेवण्यासाठी लॉकर
आठवड्यातील एक दिवस दप्तरमुक्‍त शाळा उपक्रम

दप्तराच्या अतिरिक्‍त वजनामुळे दुष्परिणाम
सांधे, पाठीदुखीची तक्रार
लवकर थकवा येणे, अशक्‍तपणा
अभ्यासात लक्ष न लागणे

नाशिक - शाळांच्या पातळीवर अनेक उपाययोजना राबवताना विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यात काहीअंशी यश आले आहे; परंतु अद्याप निर्धारित केलेल्या वजनापेक्षा जादा वजन असल्याचे चित्र पाहायला मिळते. ‘सकाळ’तर्फे या संदर्भात विविध शाळांना भेटी देत दप्तराच्या वजनाची पडताळणी करण्यात आली असता, छोट्या छोट्या उपाययोजनांतून दप्तराचे ओझे आणखी कमी करण्यास वाव असल्याचे  आढळले.

दप्तराच्या ओझ्यासंदर्भात उच्च न्यायालयात पालकाने दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली. शासन, शैक्षणिक संस्था, शालेय प्रशासन व पालक यांच्यामार्फत संयुक्‍तिकरीत्या प्रयत्न केले जात असले, तरी अद्याप शंभर टक्‍के यश मिळाले असे म्हणता येणार नाही. अद्याप अनेक विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याखाली दबले जात आहेत. 

शहरातील काही शाळांना भेटी देताना दप्तराच्या वजनाशी निगडित तपासणी केली असता, काही शाळांमध्ये निर्धारित वजनाच्या जवळच कमी-अधिक वजन असल्याचे आढळले. मात्र, काही ठिकाणी दप्तराचे ओझे असह्य असल्याचीही स्थिती होती. दप्तराचे वजन कमी करण्यासाठी शाळांकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्याचेही या पाहणीत 
लक्षात आले. 

पालकांचा आग्रह वाढवतो वजन
विद्यार्थ्यांनी सर्व पाठ्यपुस्तके सोबत ठेवावीत, असा काही पालकांचा आग्रह असतो. बहुतांश शाळांमध्ये शुद्ध पाणी (आरओ प्युरिफायर) उपलब्ध असतानाही विद्यार्थ्याला पाण्याची बाटली दिली जाते. पाण्याची बाटली, डबा, रिकाम्या बॅगचे वजन साधारणत: एक किलो असल्याने पुढे वह्या-पुस्तके व साहित्य बॅगेत ठेवल्याने दप्तराचे ओझे वाढते. पालकांनी या बाबींचा विचार केल्यास साधारणत: पाऊण किलोपर्यंत वजन कमी करता येऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

१ ली-२ रीसाठी - १.५ किलो
३ री ते ५ वीसाठी - २.३ किलो
६ वी-७ वीसाठी - ४ किलो
८ वी-९ वीसाठी - ४.५ किलो
१० साठी - ५ किलो
(केंद्र शासनाचे वजनाबाबत निकष)

दप्तराचे वजन कमी करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना शंभर पानी वह्यांची सक्‍ती केली आहे. शुद्ध पाण्याची सुविधादेखील केल्याने पाण्याच्या बाटलीचे वजन कमी झाले आहे. पालकांनीही आपल्या पाल्याच्या दप्तराचे ओझे कमी राहील, यासाठी सहकार्य करणे अपेक्षित असते.
- संगीता टाकळकर, मुख्याध्यापिका, रचना माध्यमिक विद्यालय

नवीन शैक्षणिक वर्षात नुकत्याच झालेल्या पालक-शिक्षक संघाच्या बैठकीत दप्तराचे वजन कमी करण्यासंदर्भात उपाय सुचविले आहेत. विद्यार्थ्यांवर अतिरिक्‍त ताण येऊ नये, अशी शाळांचीही भूमिका असते. योग्य समन्वयातून या प्रश्‍नाची तीव्रता कमी होईल, असा विश्‍वास आहे.
- प्रज्ञा पोरजे, पालक

वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थी चांगले गुण मिळविण्यासाठी कठोर परिश्रम घेताना दिसतात. मात्र, अप्रत्यक्षपणे जास्त अभ्यास करण्याच्या भावनेतून दप्तराचे वजनही वाढत जाते. जादा वजनाच्या दप्तरामुळे विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्‍यकता आहे.
- गोकुळ पिंगळे, पालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School Student Book Weight Issue