जिल्हा परिषदेत भरली शाळा! 

जिल्हा परिषदेत भरली शाळा! 

जळगाव - जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती बिकट असून, विद्यार्थी पटसंख्या कमी असल्याने ती वाढविण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर आहे. परंतु, विद्यार्थी आहेत; मात्र त्यांना शिकवायला शिक्षकच नाहीत. यामुळे शिकविण्यासाठी शिक्षक देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी व पालकांनी गुरुवारी (ता. 4) थेट जिल्हा परिषद गाठत मुख्य प्रशासकीय इमारतीच्या आवारातच शाळा भरवत अनोखे आंदोलन केले. 

जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील ढालगाव (ता. जामनेर) येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेची ही व्यथा आहे. पहिली ते आठवीपर्यंतची शाळा असून, एकूण 185 पटसंख्या आहे. मात्र, या शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नाही. विशेष म्हणजे, शाळेत असलेल्या तीनही शिक्षकांची बदली नुकतीच करण्यात आली आहे. त्याऐवजी दिलेले दोन शिक्षक अद्याप रुजू झालेले नाहीत. यामुळे शालेय समितीचे सदस्य व पालकांनी आज विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा नेला. दुपारी बाराच्या सुमारास सर्व जण जिल्हा परिषदेत आल्यानंतर नवीन इमारतीच्या आवारात शाळा भरविण्यात आली. या वेळी शालेय समितीचे अध्यक्ष इक्‍बाल तडवी, सलीम तडवी, खैरुद्दीन तडवी आदी उपस्थित होते. 

दरम्यान, शिक्षक नसल्याने पहिल्या दिवशी शाळा पंचायत समितीच्या खोलीत भरविण्यात आली होती. शाळा उघडून वीस दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही शिक्षक नसल्याने पालकांनी आज सकाळी शाळेला कुलूप ठोकत मोर्चा काढला. जिल्हा परिषदेत विद्यार्थी आंदोलन करीत असतानादेखील प्रशासन शांत होते. प्रभारी शिक्षणाधिकारी डॉ. देवांग यांनी सुरवातीला पालकांची भेट घेतली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर हे आपल्या दालनात बसले होते. शेवटी विद्यार्थी कचोरी व सामोसे घेऊन त्यांच्या दालनात गेले. त्या वेळी रवींद्र देशमुख यांनी मस्कर यांना सामोसे देत विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक देण्याची मागणी केली. त्यानंतर म्हणजे अडीच तासांनंतर प्रशासन हलले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com