
Nandurbar News: राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षणात नंदुरबार जिल्ह्यातील 209 शाळांची निवड
तळोदा : राज्यस्तरीय संपादणूक सर्वेक्षण शुक्रवारी (ता. २४) नंदुरबार जिल्ह्यातील २०९ शाळांमध्ये होणार आहे. त्यासाठी तिसरी, पाचवी व आठवीचे वर्ग असणाऱ्या वेगवेगळ्या २०९ शाळांची निवड करण्यात आली.
हे संपादणूक सर्वेक्षण १७ मार्चला घेण्यात येणार होते. मात्र जुन्या पेन्शनकरिता झालेल्या कर्मचारी संपामुळे पुढे ढकलण्यात आले होते. या सर्वेक्षणासाठी २०९ क्षेत्रीय अन्वेषकांची नेमणूक करण्यात आली आहे.
तिसरी, पाचवी व आठवीमधील विद्यार्थ्यांची मराठी व गणित या विषयातील अध्ययन संपादणूक पातळी तपासणे, अध्ययनातील कठीण क्षेत्रांचा शोध घेणे, लिंग, ग्रामीण व क्षेत्र, सामाजिक संवर्ग, व्यवस्थापन प्रकार यानुसार विद्यार्थ्यांच्या अध्ययन संपादणुकीतील फरक पाहणे,
सर्वेक्षण निष्कर्षानुसार आवश्यक क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी उपाययोजना सुचविणे तसेच वार्षिक कार्य योजना व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सर्वेक्षण निष्कर्षांचा वापर करणे अशा उद्दिष्टांसाठी हे सर्वेक्षण राज्यभरातील जिल्हा परिषदा, महापालिका, पालिका, खासगी अनुदानित, आदिवासी विभाग, समाजकल्याण, कटक मंडळ अशा विविध व्यवस्थापन प्रकारच्या शाळांमध्ये होणार आहे.
सर्वेक्षणात राज्यातील तिसरीच्या वर्गाच्या एकूण तीन हजार ७५६ शाळा, पाचवीच्या व चार हजार ५० शाळा, तर आठवीच्या चार हजार १२७ अशा एकूण ११ हजार ९३३ शाळांमध्ये सर्वेक्षण शुक्रवारी होणार आहे. कर्मचारी संपामुळे सर्वेक्षण पुढे ढकलावे लागले होते.
दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात यासाठी तिसरीच्या ८६, पाचवीच्या ६२ व आठवीच्या वर्ग असणाऱ्या ६१ अशा एकूण २०९ शाळांची निवड करण्यात आली. सर्वेक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी, शिक्षण विभागातील विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, विशेष शिक्षक, अध्यापक विद्यालयातील अध्यापक तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांची सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आली. दरम्यान, सर्व्हेक्षणासाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली आहे.
हेही वाचा: एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!