माजी मंत्री ए. टी. पवारांचे वृद्धापकाळाने निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

कळवणचे माजी आमदार व माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या निधनाने एका सच्च्या सहकाऱ्याला मुकलो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

कळवण - नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात सुवर्णमहोत्सव साजरा करणारे माजीमंत्री अर्जून तुळशीराम तथा ए. टी. पवार (वय 79) यांचे आज सकाळी मुंबईत वृध्दापकाळाने निधन झाले. उद्या (ता. 11) सकाळी त्यांच्या दळवट (ता. कळवण) या मूळगावी अंत्यसंस्कार होतील.

त्यांच्या मागे शकुंतला, पत्नी मुलगा नितीन, प्रवीण, स्नुषा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री, राष्ट्रवादीच्या प्रदेश पदाधिकारी डॉ. भारती, कन्या गितांजली, डॉ. विजया, नातवंडे असा परिवार आहे.

मुंबईमध्ये बॉम्बे हॉस्पीटलमध्ये गेल्या आठवडाभरापासून ते उपचारासाठी दाखल होते. राज्यशास्त्रातील एम. ए. पदवीधर असलेल्या ए. टी. पवारांचा 1 डिसेंबर 1938 ला जन्म झाला. वयाच्या 34 व्या वर्षी आमदार होण्याचा मान त्यांनी मिळवला. आतापर्यंत विधानसभा निवडणुकीत त्यांना दोनवेळा पराभव पत्करावा लागला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय म्हणून राज्यभर ओळखले जात होते.

आदिवासी विकासमंत्री, पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री, तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. आदिवासी विकास विभाग पुण्याहून नाशिकमध्ये आणण्यात त्यांचे योगदान राहिले आहे. आश्रमशाळांच्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये शिक्षण पोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. पूनंद धरणासाठी सतत पाठपुरावा करण्यासह गिरणा खोऱ्यातील सिंचनावर त्यांनी भर दिला होता. त्यामुळे "पाणीदार नेता' अशी त्यांची ओळख झाली. आदिवासी भागातील दळवळणाची सुविधा त्यांच्यामुळे वाढल्या होत्या. एटी म्हणजे, पक्ष अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली. 

आदिवासी भागामध्ये शिक्षणाची गंगोत्री पोचवणारे स्वर्गीय दादासाहेब बीडकर, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड, महाराज धैर्यशीलराजे पवार, मूळचंदभाई गोठी यांच्या मार्गदर्शनाखाली ए. टी. पवारांनी राजकारणात प्रवेश केला. दळवटच्या आदिवासी विकास सोसायटीचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी 1967 ते 1972 मध्ये जिल्हा परिषदेत प्रतिनिधीत्व केले. 1968 मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि नंतर शिक्षण, कृषी-पशुसंवर्धन सभापती म्हणून काम पाहिले. 1978 मध्ये कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सांभाळले. मधल्या काळात त्यांनी भारतीय जनता पक्षामधून राजकीय कारकीर्द पुढे नेली. 

विकासातील म्होरक्‍या हरपला
सतत नऊवेळा विधानसभेत एखाद्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणे म्हणजे योगायोग अथवा अपघात नव्हे. हे ए. टी. पवारांच्या कार्याच्या पावतीचे लक्षण आहे, अशा शद्बांमध्ये आदरांजली वाहून वनाधिपती विनायकदादा पाटील म्हणाले, की ए. टी. पवार हे कळवणचे विकासपुरुष होते. शून्यातून समृद्धीकडे कळवणचा प्रवास झाला. रस्ते, पाणी, शिक्षणात त्यांनी आदिवासी भाग अग्रेसर केला. पश्‍चिम वाहिनी नद्या पूर्ववाहिनी करुन आधुनिक भगिरथाची भूमिका त्यांनी पार पाडली. माझे पन्नास वर्षांचे जीवलग मित्र होते. त्यांच्या निधनाने आदिवासी विकासाला दिशा देणारा म्होरक्‍या हरपला आहे.

कळवणचे माजी आमदार व माजी मंत्री ए. टी. पवार यांच्या निधनाने एका सच्च्या सहकाऱ्याला मुकलो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

Web Title: Senior NCP leader A T Pawar passes away