किर्तनाच्या मानधनातून गाईंची सेवा 

दीपक कच्छवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

मी ब्रह्मचारी असल्याने पैसा कमवू तरी कोणासाठी. माझे आजपर्यंत कुठल्याही बॅंकेत बचत खाते नाही. गो शाळेतच मी गायींची सेवा करतो. तेच माझे कुटुंब असून त्यातच मला समाधान लाभते. 
- ह. भ. प. रविदास महाराज, वडगाव लांबे (ता. चाळीसगाव)

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) ः राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्याने चाऱ्याअभावी गुरे पाळणे जिकरीचे बनले आहे. अशा दाहकतेतही वडगाव लांबे (ता. चाळीसगावचा) येथील वटेश्‍श्वर आश्रमाचे रविदास महाराज सद्यःस्थितीत शंभरहून अधिक गायींचा सांभाळ करीत आहेत. विशेष म्हणजे, त्यांना कीर्तनाच्या मोबदल्यात मिळणारे मानधन ते गायींच्या पालनपोषणावर खर्च करीत असल्याने ते खऱ्या अर्थाने गोपालक ठरले आहेत. 

वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) या गिरणा काठालगतच्या गावात वटेश्‍वर आश्रम व महादेवाचे मंदिर आहे. वरसाडे (ता. पाचोरा) येथील रहिवासी असलेले ह.भ.प. रविदास महाराजांनी या ठिकाणी गायी पाळल्या आहेत. वयाच्या सतराव्या वर्षीच त्यांनी आपले घर सोडले. ब्रम्हचारी असलेल्या रविदास महाराजांना लहानपणापासून कीर्तनाची आवड असल्याने त्यांनी आळंदीत नऊ वर्षे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेतले. 

चौदा वर्षांपासून गो शाळा 
रविदास महाराजांनी वडगाव लांबे येथील वटेश्‍श्वर आश्रमात गो शाळा सुरु केली. आज या गो शाळेत शंभरच्यावर गायी आहेत. तब्बल चौदा वर्षापासून ते गायींची सेवा करीत आहेत. गायींना चारण्यापासून ते त्यांचे शेण आवरण्यापर्यंतची सर्व कामे स्वतः रविदास महाराज करतात. या आश्रमासह औरंगाबाद जिल्ह्यातील निंबाईत येथेही रविदास महाराजांनी दोनशेच्यावर गायींचे संगोपन सुरु ठेवले आहे. वडगावला गो शाळेच्या शेजारी थोडीशी शेतजमीन आहे. त्यावर ते नांगर चालवून शेती तयार करतात व त्यातून गायींसाठी चाऱ्याची लागवड करतात. त्यामुळे रात्रीचे वैरण त्या चाऱ्यावरच असते. तालुक्‍यात नावारूपाला आलेली गो शाळा केवळ रविदास महाराजांमुळेच सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

कीर्तनाचे मानधन गायींवर 
रविदास महाराज हे कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रभर ठिकठिकाणी जातात. अनेक सप्ताहांमध्ये त्यांच्या कीर्तनांचे आयोजन केले जाते. त्या बदल्यात त्यांना आर्थिक स्वरूपाचा जे मानधन मिळते, ते सर्वच्या सर्व गायींच्या चारापाण्यावर खर्च करतात. गायीच्या सेवेसाठी त्यांनी जणू आपले सर्वस्व अर्पण केले आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीत पशुधन मालक वैतागले आहेत. रविदास महाराज मात्र अशाही परिस्थितीत चांगल्या पद्धतीने गायीचा सांभाळ करीत आहेत. या गायींमध्ये ज्या गायी दूध देणाऱ्या आहेत, त्यांचे दूध ते काढत नाहीत तर वासरांना पाजतात हे विशेष. 

रात्रभर डोळ्यांत तेल घालून पहारा 
वडगाव परिसरात तीन महिन्यांपासून बिबट्याने धुमाकुळ घातला होता. एखादे वेळी बिबट्या गायींच्या गोठ्यात शिरला तर अनर्थ घडू शकतो. शिवाय एखाद्या गायीला वासरु झाल्यानंतर मोकाट कुत्र्यांपासून त्याला धोका असतो. त्यामुळे रविदास महाराज रात्रभर डोळ्यांत तेल घालून पहारा करतात. वडगाव परिसरात बिबट्याचे गुरांवर बरेच हल्ले झाले. मात्र, या गो शाळेवर एकही हल्ला झाला नाही, तो केवळ रविदास महाराजांच्या सतर्कतेमुळेच. 

मी ब्रह्मचारी असल्याने पैसा कमवू तरी कोणासाठी. माझे आजपर्यंत कुठल्याही बॅंकेत बचत खाते नाही. गो शाळेतच मी गायींची सेवा करतो. तेच माझे कुटुंब असून त्यातच मला समाधान लाभते. 
- ह. भ. प. रविदास महाराज, वडगाव लांबे (ता. चाळीसगाव)

Web Title: Service of cows through spiritual