
Dhule News | 30 वर्षे टिकतील असे रस्ते होतील : शीतल नवले
धुळे : सभापतिपदाच्या पहिल्या दिवसापासून काम सुरू केले व वर्षभरात शहरासाठी केलेल्या विविध कामांचा लेखाजोखा मांडत यातून धुळेकरांना बऱ्यापैकी न्याय देता आला, अशा भावना मावळते स्थायी समिती सभापती शीतल नवले यांनी व्यक्त केल्या.
शहरातील रस्ते दर्जेदार होतील यादृष्टीने काम केले आहे. त्यामुळे डांबरी रस्ते दहा वर्षे, तर काँक्रिटचे रस्ते किमान ३० वर्षे टिकतील अशा पद्धतीने कामे होतील, असा विश्वासही श्री. नवले यांनी व्यक्त केला. (Sheetal Navale say in press meet There will be roads that will last for 30 years Dhule News)
महापालिका स्थायी समिती सभापती शीतल नवले यांचा सभापतिपदाचा कार्यकाळ संपत असून, ८ फेब्रुवारीला त्यांच्या जागी नूतन सभापती विराजमान होतील. या पार्श्वभूमीवर श्री. नवले यांनी सोमवारी (ता. ६) महापालिकेतील त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेतली.
ते म्हणाले, की मी स्वतः अभियंता असल्याने महापालिकेच्या अभियंत्यांसोबत बसून रस्त्यांसाठी अंदाजपत्रके तयार केली. रस्ते दर्जेदार होतील यावर माझा भर राहिला आहे. डांबरी रस्ते किमान दहा वर्षे, काँक्रिटचे रस्ते किमान ३० वर्षे टिकतील अशा पद्धतीने कामे होतील.
पाणीपुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशनवर सोलर सिस्टिम कार्यान्व्ति करण्यासाठी शासनाकडे निधी मागितला. ही सिस्टिम कार्यान्वित झाल्यानंतर महापालिकेचे सुमारे सव्वा कोटी रुपये वीजबिल वाचणार असल्याचे श्री. नवले म्हणाले.
हेही वाचा: प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली
देवपूरचे चित्र बदलेल
भूमिगत गटारांमुळे शहरातील देवपूर भागात काही प्रमाणात नाराजी होती, असंतोषही होता. मात्र विकासकामे करताना थोडेफार सहनही करावे लागते. देवपूरचे चित्र येत्या सहा महिन्यांत नक्कीच बदलणार आहे. सहा महिन्यांत दोनशे कोटींची कामे देवपूर भागात प्रस्तावित असून, उर्वरित धुळ्यासाठीदेखील १०० कोटी रुपये आणले जातील.
शहरातील एलईडी पथदीपांमुळे २० ते २५ लाख रुपये वीजबिलात बचत होत आहे. महापालिकेतील मानधनावरील २६८ कर्मचाऱ्यांचे मानधन वाढविले. त्यांचे मानधन १५ हजार, तर अभियंत्यांचे मानधन २५ ते ३० हजार रुपये केले. १५ अभियंत्यांची भरती केली. त्यातील १२ मानधनावर तर तीन कायम आहेत.
मनपात नवीन १०० पदे भरण्याची परवानगी मिळाली आहे. या पदभरतीतून अक्कलपाडा योजना कार्यान्वित करण्यासाठी ५५ कर्मचारी उपयुक्त ठरतील. स्वच्छ भारतअंतर्गत बायोगॅस प्रकल्पासाठी कार्यादेश दिला आहे. महापालिकेच्या नवीन आठ दवाखान्यांना मान्यता मिळाल्यापासून त्यांपैकी तीन दवाखान्यांची निविदाप्रक्रिया झाली आहे. हद्दवाढ क्षेत्रातील ७२ कर्मचाऱ्यांचे महापालिकेत समावेशन केले.