एरंडोल तालुक्‍यात शिवसेनेचे वर्चस्व 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

एरंडोल तालुक्‍यात शिवसेनेने तीन गटांपैकी दोन व सहा गणांपैकी चार गणांवर विजय मिळवून पंचवीस वर्षापासून असलेले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. एरंडोल तालुका शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे निकालावरून स्पष्ट होते. राष्ट्रवादीला फक्त एका गणात विजय मिळविता आला. भाजपला सुद्धा केवळ एकाचा गटात तो ही निसटता विजय प्राप्त झाला आला. कॉंग्रेसचे तालुक्‍याचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. 
- आल्हाद जोशी, एरंडोल, निवडणूक विश्‍लेषण. 

तालुक्‍यातील विखरण-रिंगणगाव गटात शिवसेनेच्या विद्यमान सदस्या जयश्री महाजन यांचे पती नाना महाजन यांनी भाजपच्या पल्लवी समाधान पाटील यांचा पराभव करून भाजपला जोरदार धक्का दिला. विखरण गणातील लढत भाजप आणि शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. या गणात युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख विवेक पाटील यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष एस. आर. पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. राष्ट्रवादीचे उमेदवार कांतिलाल पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले. रिंगणगाव गणात माजी सभापती मोहन सोनवणे यांच्या पत्नी तथा शिवसेनेच्या उमेदवार रजनी सोनवणे यांनी भाजपच्या उमेदवार मंदा कोळी यांचा मोठ्या मताधिक्‍याने पराभव केला. या गणात देखील राष्ट्रवादीच्या उमेदवार गीता बडगुजर तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. 

तळई-उत्राण गटात शिवसेनेच्या उमेदवार वैशाली मंगलसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार नकुबाई भिल यांचा चार हजार मतांनी पराभव केला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आमले यांचा हा मतदार संघ असल्यामुळे शिवसेनेने या गटात प्रतिष्ठा पणाला लावली होती. वीस वर्षापासून या गटात शिवसेनेचा उमेदवार विजयी झालेला आहे. तळई गणात माजी सभापती दिलीप रोकडे यांच्या मातोश्री शिवसेना उमेदवार शांताबाई महाजन यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार मालुबाई पाटील यांचा पराभव केला. उत्राण गणात शिवसेनेचे उमेदवार अनिल महाजन यांनी भाजप उमेदवार भागवत पाटील यांचा पराभव केला. भागवत पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तरीही मतदारांनी त्यांना नाकारले. शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढवणारे गजानन पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 

कासोदा-आडगाव गटात भाजपच्या उमेदवार उज्वला पाटील यांचा निसटता विजय झाला. त्यांना शिवसेनेच्या उमेदवार सुनंदा खैरनार यांनी कडवी झुंज दिली. या गटातील शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार तथा पंचायत समितीच्या माजी सभापती सुवर्णा पाटील यांची उमेदवारी शिवसेनेसाठी त्रासदायक ठरली. जिल्हा परिषदेच्या दोन माजी उपाध्यक्षांच्या पत्नी उमेदवार असलेल्या या गटातील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार राजश्री पवार यांनी निवडणुकीत नवख्या असून देखील चांगली लढत दिली. या गटातील विजयामुळे तालुक्‍यातील भाजपचे अस्तित्व काही प्रमाणात दिसून आले. कासोदा गणात अपक्ष उमेदवार रेशमाबी पठाण यांनी भाजप उमेदवार उषाबाई गादीकर आणि शिवसेनेच्या उमेदवार पद्‌मा पांडे यांचा पराभव करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. या गणातील भाजपच्या उमेदवार पंचायत समितीचे विद्यमान सभापती बापू गादीकर यांच्या पत्नी असून शिवसेनेच्या निष्ठावान पदाधिकारी असलेले बापू गादीकर यांनी ऐन निवडणुकीच्या वेळी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश करून शिवसेनेसमोर आवाहन उभे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मतदारांनी पक्षांतर केलेल्या गादीकरांना नाकारले. आडगाव गणात राष्ट्रवादीच्या उमेदवार निर्मला मालचे यांनी भाजप उमेदवार चंद्रकला भिल यांचा पराभव केला. शिवसेना उमेदवार सरस्वती मोरे तिसऱ्या तर कॉंग्रेसचे केशरलाल ठाकूर चौथ्या क्रमांकावर राहिले. 

Web Title: Shiv Sena district dominated