नाशिक जिल्ह्यात शिवसेनाच नंबर वन 

श्‍याम उगले - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 6 मार्च 2017

नाशिक - नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मागे टाकत शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 11 विधानसभा मतदारसंघांमधील सहा मतदारसंघांत शिवसेनेने या निवडणुकीत पहिल्या क्रमांकाची मते मिळवली आहेत, तर भाजपने तीन मतदारसंघांत प्राबल्य राखत दुसरा क्रमांक मिळवला आहे. मतांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ नाशिकरोड-देवळाली या एकमेव मतदारसंघात पहिल्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. 

नाशिक - नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मागे टाकत शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 11 विधानसभा मतदारसंघांमधील सहा मतदारसंघांत शिवसेनेने या निवडणुकीत पहिल्या क्रमांकाची मते मिळवली आहेत, तर भाजपने तीन मतदारसंघांत प्राबल्य राखत दुसरा क्रमांक मिळवला आहे. मतांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ नाशिकरोड-देवळाली या एकमेव मतदारसंघात पहिल्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. 

जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक 25 सदस्य निवडून आल्याने तो सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. त्या खालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 18 सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत मोठी मजल मारली आहे. मागील वेळी केवळ चार सदस्य असलेल्या भाजपचे या वेळी 16 सदस्य निवडून आले आहेत, तर मागील वेळी 14 सदस्य असलेल्या कॉंग्रेसची या वेळी घसरण होऊन केवळ आठ सदस्य निवडून आले आहेत. या शिवाय चार अपक्ष व मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तीन सदस्य असे जिल्हा परिषदेतील बलाबल आहे. 

विधानसभा निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातील अकरा विधानसभा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादीने व शिवसेनेने प्रत्येकी चार मतदारसंघांमध्ये विजय मिळविला होता. तसेच कॉंग्रेस, भाजप व माकप यांनी प्रत्येकी एक मतदारसंघ जिंकला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसने चार मतदारसंघांमध्ये विजय मिळविताना 30 टक्के मिळविली होती, तर शिवसेनेला 28.80 टक्के मते मिळाली होती. त्यानंतर सव्वादोन वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी घसरण झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला विधानसभा निवडणुकीत येवला, दिंडोरी, बागलाण व नांदगाव या चार मतदारसंघांमध्ये यश मिळाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीत या चारही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला पहिला क्रमांक राखण्यात अपयश आले आहे. नांदगावमध्ये तर राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. याचवेळी नाशिक तालुक्‍यात तीन जागांवर विजय मिळविताना सर्वाधिक मते मिळवून पक्षासाठी नवीन संधीचे दार खुले केले आहे. 

शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत सिन्नर, मालेगाव, नाशिक रोड-देवळाली व निफाड मतदारसंघांमध्ये विजय मिळविला होता. या निवडणुकीत सिन्नर व निफाड मतदारसंघांत शिवसेनेला सर्वाधिक मते मिळाली असली तरी मालेगाव व नाशिक रोड-देवळाली मतदारसंघांत शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. या दोन मतदारसंघांत फटका बसलेल्या शिवसेनेने इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर, पेठ-दिंडोरी, नांदगाव व येवला या चार मतदारसंघांमध्ये क्रमांक एकची मते मिळवली आहेत. 

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात कॉंग्रेसच्या मतांची घसरण 9.67 टक्के होऊन केवळ इगतपुरीतील एका मतदारसंघात विजय मिळाला होता. विधानसभेच्या तुलनेने कॉंग्रेसची मतांची टक्केवारी (11.24) वाढली असली, तरी कॉंग्रेसला एकाही विधानसभा मतदारसंघात क्रमांक एकची मते मिळाली नाहीत. उलट इगतपुरीत शिवसेनेने कॉंग्रेसला मागे टाकले आहे. 

भाजपने मागील निवडणुकीत केवळ चांदवड-देवळा मतदारसंघात विजय मिळविला होता. या निवडणुकीत भाजपने त्या मतदारसंघात क्रमांक एकची मते मिळवितानाच मालेगाव व बागलाण या दोन मतदासंघांमध्ये सर्वाधिक मते मिळविली आहेत. यामुळे 11 मतदारसंघांचा विचार केला तर शिवसेनेने सिन्नर, निफाड, येवला, नांदगाव, पेठ-दिंडोरी व इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर या सहा मतदारसंघांत सर्वाधिक मते मिळवली आहेत. भाजपने चांदवड-देवळा हा मतदारसंघ राखतानाच शिवसेनेच्या ताब्यात असलेला मालेगाव व राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या बागलाणमध्ये सर्वाधिक मते मिळवली आहेत. राष्ट्रवादीने नाशिक रोड-देवळाली या नव्या मतदारसंघात सर्वाधिक मते मिळविली आहेत, तर माकपने कळवण-सुरगाणा मतदारसंघांत विधानसभेची पुनरावृत्ती केली आहे. 

पक्षनिहाय टक्केवारी 
पक्ष विधानसभा 2014 जिल्हा परिषद 2017 

राष्ट्रवादी कॉंग्रेस 30.03 22.77 
शिवसेना 28.80 28.22 
भाजप 19.93 21.25 
कॉंग्रेस 9. 67 11.24 

Web Title: Shiv Sena number one in Nashik district