Vidhan Sabha 2019 : युती आहेच; मात्र फॉर्म्युला विचारू नका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीतील जागावाटप हा उच्चस्तरीय विषय आहे. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना काहीच माहिती नाही. त्यामुळेच ‘आमचं ठरलंय’ असे म्हणत लोकांपुढे जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांची जागावाटपाबाबत मात्र काहीच ठरलं नसल्याचेच वक्तव्य येत असल्याने वारंवार तोंडावर पडण्याची वेळ येऊ लागली आहे.

नाशिक - शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीतील जागावाटप हा उच्चस्तरीय विषय आहे. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना काहीच माहिती नाही. त्यामुळेच ‘आमचं ठरलंय’ असे म्हणत लोकांपुढे जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांची जागावाटपाबाबत मात्र काहीच ठरलं नसल्याचेच वक्तव्य येत असल्याने वारंवार तोंडावर पडण्याची वेळ येऊ लागली आहे. युती आहे एवढंच बोलण्याचे आदेश असलेल्या भल्या भल्या नेत्यांना आणि मंत्र्यांनाही युतीचा फॉर्म्युला माहीत नाही.

राजकारणा तील सर्वांत जुनी युती म्हणून शिवसेना आणि भाजप युतीकडे पाहिले जाते. अनेक वर्षांपासून राजकारणात असलेल्या या युतीत कालौघात खटके वाढत आहेत. 

मात्र ‘दोघांत तिसरा नको’ या एकमेव कारणासाठी पटत नसले तरी, विरोधकांना दूर ठेवण्यासाठी युती टिकून आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तुटलेली युती पुन्हा यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून एकत्र आली आहे. मात्र, या वेळच्या युतीला कुठल्या फॉर्म्युल्याचा आधार आहे. हे मात्र जिल्हास्तरीय नेत्यांनाही माहीत नाही. केवळ दोन्ही पक्षांचे नेते ठरवतील हेच प्रमाण मानून जिल्हा नेत्यांना सतरंज्या उचलण्यापलीकडे काहीही काम नाही. तरीही, जागावाटपाबाबत मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यात धुम्मस सुरू आहे. 

फॉर्म्युला विचारू नका
राज्यातील युती झाली तेव्हापासून शिवसेना १७१ भाजप ११७ या फॉर्म्युल्यावर अनेक वर्षे चालली. मात्र भाजपला देशात बहुमत मिळाल्यानंतर अपेक्षा वाढलेल्या भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीत युतीचा फॉर्म्युला बाद ठरविला. तेव्हापासून पक्षातील उच्च पदस्थाशिवाय कुणाला माहिती नसलेल्या युतीत जागावाटपावरून कायम कलगीतुरा रंगू लागला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नेमके उलटे सूर आळविले. त्यामुळे पुन्हा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एकूणच युती आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण फॉर्म्युला काय हे मात्र विचारू नका... अशीच युतीच्या नेत्यांची गत झाली आहे. यात सगळ्यात मोठी अडचण इच्छुकांची झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena and bjp Alliance