शिवसेना, राष्ट्रवादीच्या आघाडीचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

नाशिक - जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी शक्‍य तेथे कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीची मदत घेण्याचे आदेश "मातोश्री'वरून आल्याचे आज जाहीर झाले. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा निरोप आल्याचे आज सांगण्यात आले. यामुळे नाशिक जिल्हा परिषदेत शिवसेना व राष्ट्रवादी यांचा एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. दोघांची मिळून सदस्य संख्या 44 आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सत्तेचे गणित जुळवण्यासाठी एकीकडे शिवसेना, कॉंग्रेस व माकप यांची मोट बांधण्याचे काम सुरू होते, तर दुसरीकडे भाजप व राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु, दोन्ही बाजूंनी बहुमताचा आकडा जुळण्याची खात्री मिळत नसल्याने या चर्चा हवेत विरल्या. त्यानंतर अचानक शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दूतांमार्फत चर्चा सुरू केली; परंतु वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट आदेश येत नसल्यामुळे या चर्चांमधूनही ठोस काही हाती लागत नव्हते. परंतु, पंचायत समिती सभापती निवडणूक प्रक्रियेच्या आधी याबाबत निश्‍चित निर्णय देणे अपेक्षित असल्याने आज शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना तशा सूचना आल्याचे समजते. यामुळे पंचायत समिती निवडणुकीत त्याप्रमाणे आघाडी झाल्यानंतर 21 मार्चला होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, अशी चिन्हे आहेत.

शिवसेनेतर्फे चर्चेचे अधिकार ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह जिल्हाप्रमुखांना आहेत, तर राष्ट्रवादीतर्फे जिल्हा निवड मंडळाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्यासह जिल्हा प्रमुखांकडे असल्याचे समजते. यामुळे पंचायत समिती सभापतींच्या निवडीनंतर या चर्चेला वेग येण्याची चिन्हे आहेत.

Web Title: shivsena ncp aghadi in zp