पाचोऱ्यात पाणीटंचाईचे चटके असह्य 

सी.एन.चौधरी
शुक्रवार, 30 मार्च 2018

पाचोरा : शहराला पाणीपुरवठा करणारा किंबहुना शहरासाठी जलसंजीवनी ठरलेला के. टी. बंधारा तहानल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होऊन पाणीटंचाईचे चटके असह्य होऊ लागले आहेत. बहुळा पाणीपुरवठा योजनेचे पाणी शहरवासीयांसाठी द्यावे, अशी मागणी होत आहे. 

पाचोरा : शहराला पाणीपुरवठा करणारा किंबहुना शहरासाठी जलसंजीवनी ठरलेला के. टी. बंधारा तहानल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होऊन पाणीटंचाईचे चटके असह्य होऊ लागले आहेत. बहुळा पाणीपुरवठा योजनेचे पाणी शहरवासीयांसाठी द्यावे, अशी मागणी होत आहे. 

पाचोरा पालिकेंतर्गत आतापर्यंत दोन वेळा पाणीपुरवठ्याच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. सुरवातीला 5 कोटी व नंतर 18 कोटीची योजना राबविण्यात आली असली तरी पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत मात्र के. टी. बंधाराच आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी बहुळा धरणातून पाणीपुरवठ्याची साडेसहा कोटीची योजना तातडीने मंजूर करून बहुळा धरणाचे पाणी पाचोऱ्यात आणले गेले होते. काही दिवस या योजनेद्वारे शहरासाठी पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, हे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचा सूर त्यावेळी उमटला होता. मागीलवर्षी देखील पाणीपुरवठा विस्कळित झाल्यानंतर बहुळाच्या पाण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, त्या योजनेचे पाणी आणले गेले नाही. परिणामी, पाणीपुरवठ्याची संपूर्ण मदार के. टी. बंधाऱ्यावर असल्याचे सिद्ध झाले आहे. 

एकाच महिन्यात पाणी संपले 
ओझर (ता. पाचोरा) गावाजवळ गिरणा नदीपात्रातील के. टी. बंधाऱ्यात गिरणा धरणातील आवर्तनाचे पाणी साठवून शहराला पाणीपुरवठा केला जातो. साधारणतः एका आवर्तनाचे पाणी तीन महिने पुरते. मात्र, अलीकडच्या काळात बंधाऱ्यातून होणारी पाणी गळती आणि बंधारा परिसरातील पाचोरा व भडगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून होणारी पाणीचोरी यामुळे तीन महिने पुरणारे आवर्तनाचे पाणी अवघ्या महिनाभरात संपत असल्याने त्याचा परिणाम पाणीटंचाईची तीव्रता वाढण्यात होत आहे.

बंधाऱ्यातील पाण्याची चोरी रोखण्यासाठी पालिका विविधांगी प्रयत्न करते, मात्र, त्यात यश येत नाही. त्यामुळे पाणी चोरीला आळा घालणे अशक्‍य होत आहे. जलसंजीवनी ठरलेला के. टी. बंधारा आता कोरडाठाक झाल्याने पाणीपुरवठा कमालीचा विस्कळित झाला आहे. त्यात विजेचा लपंडाव, यंत्रसामग्रीत सातत्याने होणारा बिघाड याबाबी दुष्काळात तेरावा महिना ठरत आहेत. 

गिरणेतून आवर्तन सोडावे 
शहरातील पाणीपुरवठ्याने पंधरवडा गाठला आहे. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रत्येकालाच तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागीलवर्षी पालिकेने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. यावर्षी अद्यापपर्यंत तसे काही नियोजन दिसत नाही. पाणीटंचाई निवारणार्थ योजनांची अंमलबजावणी व्हावी, गिरणा धरणातून आवर्तन मिळावे आणि मिळालेल्या आवर्तनाचा जलसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी पालिकेने कठोर नियोजन करावे, अशी मागणी होत आहे. 

पाचोरा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केटी बंधाऱ्यातील पाणी संपल्याने पाणीपुरवठा विस्कळित होत आहे. गिरणा धरणातून आवर्तन मिळवण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून व जबाबदारीने वापर करावा. आवर्तनाचे पाणी केटी बंधाऱ्यात आल्यावर पाणीपुरवठा सुरळीत होईल. नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे. 
- किरण देशमुख, मुख्याधिकारी, पाचोरा

Web Title: shortage of water at pachora