पत्रकारांवर पुन्हा हल्ला करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

'दैनिक सकाळ'चे बातमीदार आणि सुरगाणा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरामण चौधरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला करणार्‍या संशयितांना जामीन मिळताच काल (गुरुवारी) चौधरी यांना पुन्हा घरी बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

सटाणा : 'दैनिक सकाळ'चे बातमीदार आणि सुरगाणा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हिरामण चौधरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला करणार्‍या संशयितांना जामीन मिळताच काल (गुरुवारी) चौधरी यांना पुन्हा घरी बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

हल्लेखोरांचा जामीन तात्काळ रद्द करून त्यांना अटक करावी, अन्यथा शासन व प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बागलाण तालुका मराठी पत्रकार संघातर्फे आज (शुक्रवार) देण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार विश्वास चंद्रात्रे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी तहसिलदार जितेंद्र इंगळे व पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले.

नाशिक जिल्ह्याच्या अतिदुर्गम व आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यात नि:पक्षपातीपणे पत्रकारितेचे काम करणार्‍या 'दै.सकाळ'चे बातमीदार हिरामण चौधरी यांच्यासह कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला झाला. ही बाब निंदनीय असून हल्ल्याचा सर्वत्र जाहीर निषेध व्यक्त होत आहे. हल्लेखोरांना अटक झाली आणि लगेच जामीनही मिळाला. मात्र जामीनावर सुटताच काल सायंकाळी हल्लेखोरांनी पुन्हा श्री. चौधरी यांच्यावर प्राणघातक हल्ला करून कुटुंबीयांना मारहाण केली. या प्रकाराने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित नसल्याचे दिसून येते. राज्यातील पत्रकारांवर सातत्याने हल्ले होण्याचे प्रकार वाढल्याने जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने याप्रश्नी शासनाकडे वारंवार कारवाईची मागणी केली आहे. शासनाने श्री. चौधरी यांच्यासह कुटुंबीयांना तातडीने पोलिस संरक्षण द्यावे, हल्लेखोरांचा जामीन तात्काळ रद्द करून त्यांना अटक करीत कठोर कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यानंतर होणार्‍या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. 

यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे सहखजिनदार काशीनाथ हांडे, तालुकाध्यक्ष रमेश देसले. सरचिटणीस रोशन खैरनार, कार्याध्यक्ष सतीश विसपुते, उपाध्यक्ष नीलेश गौतम, संजय जाधव, राकेश येवला, नंदकिशोर शेवाळे, शशिकांत बिरारी, राकेश शिरोडे, महेश भामरे, सुनील खैरनार, रणधीर भामरे, योगेश वाणी, तुषार रौंदळ, दीपक खैरनार, ज्येष्ठ पत्रकार अंबादास देवरे, अशोक गायकवाड, रोशन भामरे, सुनील येवला, शशिकांत कापडणीस, प्रशांत बैरागी, संजय खैरनार आदींसह पत्रकार व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Should take action on attacker of Journalist demanded by Baglan Taluka Marathi Patrkar Sangh