'स्मार्ट' मोबाईल बनवतोय अपडेट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

राजेश सोनवणे

राजेश सोनवणे
जळगाव - सध्याचा जमाना म्हणजे "कनेक्‍टिंग'चा. बदलत्या ट्रेंडमध्ये आता आलाय "फोर जी'चा जमाना अन्‌ सारे काही एका क्षणात उपलब्ध झाले. गेल्या तीन- चार वर्षात मोबाईल क्रांती मोठ्या प्रमाणात झाली. प्रत्येकाच्या हातात केवळ मोबाईल नव्हे, तर स्मार्टफोन पोहोचला. फोर जीच्या या जमान्यात असंख्य फीचर्स असलेला मोबाईल आजचा ट्रेंड बनला आहे. जितकी जास्त फीचर्स तितका मोबाईल वापरणारा "अपडेट' असे समीकरणच बनले आहे.

बदलत्या ट्रेंडमुळे विविध कंपन्यांनी मोबाईलची असंख्य मॉडेल्स बाजारात आणली. सगळे मोबाईल समोर ठेवले तर त्यातला कोणता घेऊ आणि कोणता नको; असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. नवनवीन येणाऱ्या स्मार्ट फोन आणि त्याच्यातील एकापेक्षा एक अधिक चांगल्या फीचर्समुळे मोबाईलकडे आकर्षित होत चालले आहेत.

कम्युनिकेशनचे बनले सोपे माध्यम
सध्याच्या स्थितीत बहुतांश कंपन्यांनी फोर- जी इंटरनेट सेवा सुरू केली असल्याने नवीन स्मार्ट मोबाईलसाठी तरुणाईही पुढे येत आहे. विशेष म्हणजे स्मार्ट मोबाईलची क्रेझ दोन वर्षापूर्वी आली आणि पाहता पाहता संगणकापेक्षा मोबाईल भारी पडू लागले. संगणकाच्या माध्यमातून केली जाणारी कामे आता थेट मोबाईलच्या माध्यमातून केली जाऊ लागल्याने मोबाईल कम्युनिकेशनचे मोठे माध्यमच बनले. त्यात एक्‍सल शीट भरण्यापासून कोणताही रस्ता शोधण्यापर्यंत सारे काही उपलब्ध आहे. त्यामुळे आज खास करून नोकरदारवर्गाचे कार्यालयीन काम हे 60 टक्के केवळ मोबाईलवर काम होऊ लागले आहे.

फिचर्सही बदलले
मोबाईलची मागणी आणि मार्केटची परिस्थिती पाहता नवनवीन कंपन्या या मार्केटमध्ये उतरू लागल्या आहेत. कमी किमतीत जास्त फिचर्स असलेला मोबाईल मार्केटला आल्याने चांगले पर्याय उपलब्ध होऊ लागले. स्मार्टफोनचा वापर वाढल्याने कंपन्यांनी फिचर्स देखील बदलले आणि त्यात वाढ देखील केली. यात मोबाईल कॅमेराची क्‍वालिटी आज डिजिटल कॅमेराप्रमाणे झाली. बहुतांश कंपन्यांनी 20 मेगा पिक्‍सलचा कॅमेरा लावला आहे. इतकेच नाही तर सेल्फीसाठी पॉप्युलर झालेला फ्रंट कॅमेरा देखील 20 मेगा पिक्‍सल आणि फ्लॅशसह बाजारात आणला आहे.

चायना मोबाईलचाच बोलबाला
मार्केटमध्ये सर्वदूर चायना वस्तू वाढल्या असून, त्यानुसारच मोबाईल मार्केटमध्ये देखील चायनाच बोलबाला आहे. मोबाईल म्हणजे नोकिया असे समीकरण काही वर्षांपूर्वी होते. ते स्मार्टफोन आल्यानंतर सॅमसंगने काबीज केले. परंतु, आता चांगल्या फिचर्समध्ये ओपो, विवो, रेडमी नोट थ्री, असूस, लिनोओ, जिओनी यासारख्या चायनाने मार्केटमध्ये भारतीय मोबाईल कंपन्यांना मागे टाकले. तसेच सॅमसंगने देखील सात हजार रुपयांपासून "फोर जी'चा स्मार्टफोन उपलब्ध करून चायना टक्‍कर देत आहे.

मोबाईल मार्केटमध्ये जास्त फिचर्स आणि हाताळण्यास सोपा मोबाईल पसंतीस पडत आहेत. यामुळेच सध्या चायना कंपनीच्या मोबाईलला अधिक मागणी होत असून, भारतीय कंपन्या तुलनेत मागे पडत आहेत.
- देव शर्मा, वाहेगुरू मोबाईल.

Web Title: smart mobile update