टॉप टेनमध्ये ‘स्मार्ट नाशिक’ला आणूच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

नाशिक - नागरी सुविधा, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, पर्यटन यांसारख्या विषयांत इतर स्मार्ट शहरांच्या तुलनेत मागे-पुढे पडलेल्या ‘स्मार्ट नाशिक’चा गुणानुक्रम सुधारण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या स्तरांवर सध्या जोरात सुरू आहे.

नाशिक - नागरी सुविधा, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, पर्यटन यांसारख्या विषयांत इतर स्मार्ट शहरांच्या तुलनेत मागे-पुढे पडलेल्या ‘स्मार्ट नाशिक’चा गुणानुक्रम सुधारण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या स्तरांवर सध्या जोरात सुरू आहे.

मार्च-एप्रिलनंतर आचारसंहिता घोषित होऊन निवडणुकांचा बिगुल कधीही वाजू शकतो. त्याअगोदर शासनाने ‘स्मार्ट’पणे मुख्यमंत्र्यांच्या दत्तक नाशिककडे लक्ष केंद्रित करत सुधारणा, विकासाच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. नव्या आयुक्तांनी पहिल्या दहा शहरांत स्मार्ट नाशिकला स्थान मिळवून देण्यासाठी कंबर कसली असून, पालकमंत्र्यांसमवेतच्या आढावा बैठकीत तसा शब्द दिला. त्यासाठी रखडलेल्या प्रकल्पांना चालना, दर्जेदार सुविधांच्या जोडीला वाहनतळासाठी मोबाईल ॲप विकसित केले जाणार आहे.

धार्मिक, पौराणिक शहराबरोबरच सर्वच बाबतींत ‘स्मार्ट नाशिक’ करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकला काहीही कमी पडू देणार नाही, असा शब्द दिला खरा, पण सातत्याने नाशिककडे दुर्लक्षच होत गेले. 

भाजपचे तीन आमदार आणि मुख्यमंत्र्यांची साथ असतानाही काही बाबतींत सापत्नीक वागणूकही मिळाल्याचे नाशिककरांनी अनुभवले आहे. ‘स्मार्ट नाशिक’ करण्यासाठी माजी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या खांद्यावरही जबाबदारी देण्यात आली, पण त्यांचा कार्यकाळ आणि घेतलेले अनेक निर्णय हे वादग्रस्तच ठरत गेले. आता नवे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यावर स्मार्ट नाशिकला खरोखरीच स्मार्ट करण्याची आणि नाशिकचा घसरलेला क्रमांक सुधारून अव्वल शहरांच्या यादीत स्थान मिळवून देण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. श्री. गमे यांचा यापूर्वीचा प्रशासकीय अनुभव लक्षात घेता आशावाद बाळगायला हरकत नाही.  
 
आढावा बैठकीत सादरीकरण
नाशिक रोडला विभागीय आयुक्त कार्यालयात स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत विविध विकासकामांचा आढावा बुधवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीत घेतला. महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, आयुक्त राधाकृष्ण गमे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, दिनकर पाटील, लक्ष्मण सावजी, स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील  उपस्थित होते. महापालिकेतर्फे स्मार्टसिटी कामांचे सादरीकरण करण्यात आले. श्री. गमे यांनी पं. पलुस्कर सभागृहाचे नूतनीकरण करताना दर्जेदार सुविधा द्याव्यात, पथदीपांचे कामही लवकर पूर्ण करावे, असे सांगत प्रकल्पांतर्गत विविध विकासकामांना गती देण्यात येत आहे. येत्या काळात नाशिक सर्वच बाबतींत आघाडी घेईल, असे सांगितले.

आचारसंहितेपूर्वी भूमिपूजन व्हावे 
स्मार्टसिटी योजनेच्या विविध कामांना गती देण्यात यावी. त्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी ४१८ कोटींच्या आठ कामांचे भूमिपूजन व्हावे, असे पालकमंत्री महाजन यांनी सांगत गोदावरी किनारा सुशोभीकरण, पं. पलुस्कर सभागृहाचे नूतनीकरण, हरितक्षेत्र पायाभूत सुविधा विकास प्रकल्प, शिवाजी उद्यान नूतनीकरण, शहर वाहतूक सेवा, सायकल सुविधा, रामायण सर्किट, सार्वजनिक शौचालय, बस आगार, कौशल्यविकास आदी विविध कामे वेगाने पूर्ण करावीत. उर्वरित कामांसाठी आवश्‍यक निविदाप्रक्रिया राबवावी, असे निर्देश दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart Nashik Top Ten Smart City