आमदार स्मिता वाघ यांना पोलिसांनी विमानतळावर रोखले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

विमानतळावर काहीकाळ गोंधळ
स्वागतासाठी आलेल्या आमदारांना प्रवेश देण्यात आला; परंतु आमदार स्मिता वाघ यांनाच प्रवेश कसा नाकारला? पास आवश्‍यक असेल तर आमदारांना कळविले का नाही? विधान परिषद हे वरचे सभागृह आहे, तरीही ते गणतीत धरले जात नाही का? असा प्रश्‍नही उपस्थित झाला आहे. यामुळे विमानतळावर बराच गोंधळ उडाला. पालकमंत्री गिरीश महाजन विमानतळावर आल्यानंतर त्यांनी स्वागतासाठी सर्वांना सोडण्यास सांगितले. त्यानंतर सर्व आमदार व जिल्ह्याचे पदाधिकारी विमानतळावर गेले.

जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी गेलेल्या सत्ताधारी भाजपच्या आमदार स्मिता वाघ यांना पोलिसांनी विमानतळावर प्रवेश नाकारला. यामुळे त्या संतप्त झाल्या. पोलिस अधिकाऱ्यांना त्यांनी फैलावर घेत आमदारांनाच विमानतळावर रोखण्याबाबत शासनाने कोणता नवीन नियम काढला, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री फडणवीस आज एका कार्यक्रमासाठी जळगाव दौऱ्यावर आले होते. जैन हिल्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विमानाने सकाळी साडेअकराला ते जळगाव विमानतळावर आले. विमानतळावर स्वागतासाठी सत्ताधारी गटाचे आमदार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष व पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. यावेळी आमदार स्मिता वाघ विमानतळावर आल्या. त्यावेळी पोलिसांनी प्रवेशद्वारावरच त्यांचे वाहन अडविले. त्यांच्याकडे पासची मागणी केली. त्यावेळी त्या म्हणाल्या, आम्ही या अगोदरही मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला विमानतळावर आलो, त्यावेळी कधीही आमदार, खासदारांना पास पोलिसाकडून देण्यात आलेले नाहीत, तसेच आजच्या स्वागतासाठी विमानतळावर पास आवश्‍यक आहे, असा फोनही आपल्याला आलेला नाही. त्यामुळे अचानक तुम्ही पासचा नियम कसा काढला? त्यावेळी पोलिसांनी काहीएक ऐकून न घेता त्यांचे वाहन जाऊ देण्यास नकार दिला. त्यावेळी संतप्त झालेल्या आमदार वाघ आपले वाहन विमानतळाच्या बाहेरच पावसात लावून पायी चालत गेल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smita Wagh Airport Police