"नेट'कऱ्यांचा कौल : खडसेंनी शिवसेनेत जावे 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 December 2019

"सरकारनामा'ने केलेल्या सर्व्हेत नागरिकांनी थेटपणे आपली मते व्यक्त केली आहे. शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत सर्वाधिक 60 टक्के त्या खालोखाल राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत 20 टक्के तर कॉंग्रेसमध्ये प्रवेशाबाबत 10 टक्के नागरिकांनी कौल दिला आहे. तर 10 टक्के नागरिकांनी कोणत्याही पक्षात न जाता भाजपतच राहावे असे मत व्यक्त केले आहे. 

जळगाव : राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे पक्षातरांच्या मार्गावर आहेत. त्यांनी दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी खडसे कॉंग्रेसमध्ये यावेत असे मत व्यक्त केले. त्यामाध्यमातून खडसेंनी कोठे प्रवेश करावा? याचा "सरकारनामा'ने सर्वे केला असता. त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा असा कौल जनतेने दिला आहे. 

एकनाथराव खडसे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत अनेकांनी खुले मत व्यक्त केले आहे. शैलेश सोनार, अविनाश वाघमोडे, संदीप गवळी, विनोद गावडे, विलास खोत, विशाल विरकर, अंकुश कोलते, सुमीत बनगर, बालाजी पवार, विश्‍वास शेडेंकर, अशोक गावरे, नीलेश पाटील यांच्यासह अनेकांनी एकनाथराव खडसे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा असे मत व्यक्त केले आहे. तर रमेश मोरे, दुर्गेश कुलकर्णी, यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेश करावा असे मत व्यक्त केले आहे. चंदर भोसले, नामदेव परब यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करावा असे मत व्यक्त केले आहे. 
नीलेश पुकोले यांनी राष्ट्रीय समाज पक्षात जाण्याचा सल्ला दिला आहे. 
या शिवाय सुरेश गौरव यांनी गोपीनाथ मुंडेच्या नावाने पक्ष काढून त्यांचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करावी असा सल्ला दिला आहे. मनोज लोखंडे यांनी ओबीसींना घेऊन नवीन पक्ष काढतील असे म्हटले आहे. लक्ष्मण गराडे, नरेंद्र फतकल, अर्जुन डुंबरे, हरीश गजरे, नितीन माळी यांच्यासह अनेकांनी खडसे यांनी भाजपतच राहावे असे म्हटले आहे. लक्ष्मण गराडे म्हणतात, एक तर पक्ष सोडूच नये, पक्ष नेतृत्वाशी जमवून घ्यायला पाहिजे. दुसऱ्या पक्षात पण स्वतंत्रता नसते. तेवढ्या पुरते बरे मग कोणी विचारीत नाही. पक्ष सोडला की संपूर्ण करिअर संपते. 

हे नक्‍की वाचा > जनता अन्‌ शरद पवारांमुळे झाला राजकिया पुनर्जन्म... 

संन्यास घेणे, घरीच बसण्याचा सल्ला 
एकनाथराव खडसे यांनी कोणत्याही पक्षात न जाता संन्यास घ्यावा असे मतही काहींनी व्यक्त केले आहे. सम्राट तरकसे म्हणतात, खडसे यांनी बिनधास्तपणे आपल्या शेतात काम सुरू करावे व नवीन नेतृत्वाला संधी उपलब्ध करून द्यावी. गणपतराव तेले म्हणतात, निवांत हरिभजन करीत घरी बसावं, दुसऱ्या पक्षात जाणे म्हणजे स्वतःच अस्तित्व हिरावणे असेच आहे. दीपक सपकाळ पाटील म्हणतात, खडसे यांनी रिटायरमेंट घेऊन आत्मचरित्र लिहून भूकंप निर्माण करावा, सुजित मोरे म्हणतात, आता त्यांनी सरळ घरीच बसावे, रोहिदास वाळूंज यांनी खडसे यांना आपल्या वयाचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. संदीप गीते यांनी मात्र खडसेंना इशाराच दिला आहे, ते म्हणतात ते भाजपतून बाहेर पडल्यास त्यांचा राणेकाका होईल. सुभाष यादव म्हणतात, खडसे यांनी कोणत्याही पक्षात जावे परंतु अगोदर भाजप सोडावी. श्रीराम बुटेट्‌ यांनी नवीन पक्ष काढण्याचा सल्ला दिला आहे. तर काही जणांनी ओबीसींचा नवीन पक्ष काढण्याचाही सल्ला दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: social media comments khadse shivsena entri\y