मुलाने मांडली आईच्या जगण्याची लढाई

मुलाने मांडली आईच्या जगण्याची लढाई

नाशिक : मुलगी झाली म्हणून बापानं आईसह घराबाहेर काढलं... त्यानंतर आईनं भीक मागून मुलीला वाढवलं... पुढं त्या मुलीचं लग्न झाल्यावर नवऱ्यानंही फसवलं... दोन मुलं पदरात टाकल्यावर त्यानं आत्महत्या केली... एवढं सगळं पदरात पडल्यावरही तिनं हार मानली नाही... मार्केट यार्डमध्ये हमाली करून मुलांना शिकवलं... स्वतःच्या पायावर उभं केलं... तिच्याच मुलानं तिची जगण्याची लढाई शब्दात पकडण्याचा प्रयत्न केला आहे. कृष्णा पाचोरे याने लिहिलेल्या ‘लक्ष्मी ः एक असामान्य जीवनसंघर्ष’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी सहाला परशुराम साईखेडकर नाट्यगृहात होत आहे. 

म्हसरूळच्या कृष्णा पाचोरे यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले. पुढे त्यांच्या आईने (लक्ष्मी) त्याला तीन वर्षांपूर्वी गिरणारेत कापड दुकान टाकून दिले. आईच्या जगण्याची लढाई लहानपणापासून त्यानं पाहिली होती. त्यामुळे ती शब्दबद्ध करावी, असे त्याला वाटत होते. त्यातूनच हे पुस्तक आकाराला आले आहे. आईचा (लक्ष्मी) जन्म झाला, तेव्हा तिच्या अगोदर दोन मुली होत्या. बापाला मुलगा हवा होता. पण दुर्दैवाने मुलगीच झाल्याने लहान मुलगी व आईला घराबाहेर काढले. नातेवाईकही कुणी थारा देईना. मग तिनं रस्त्यावर भीक मागून लक्ष्मीला वाढवलं. अनेक वर्षे उघड्यावरच राहिली. पुढं लक्ष्मी मोठी झाली. तिचं लग्न ठरलं. लग्नानंतर कळालं, की तो ‘भाईगिरी’ करत फिरतो. पण तरीही त्याच्याशी लक्ष्मीने संसार केला. पुढं त्याचं दारूचं व्यसन इतकं वाढलं, की पूर्णवेळ तो नशेत असायचा, मारझोडही करायचा. शेवटी लक्ष्मी आपली दोन मुलं घेत त्याच्यापासून अलिप्त झाली. त्यानंतर काही दिवसातच नवऱ्यानं जीवन संपवलं. एवढ्या संकटातही लक्ष्मी डगमगली नाही.

मार्केट यार्डात भाजीचे ओझे डोक्‍यावरून वाहात कृष्णा आणि त्याच्या बहिणीला पदवीपर्यंत शिकवलं. अवधूतवाडी येथे राहूनही मुलांवर चांगले संस्कार केले. मुलेही शिक्षणाबरोबरच शास्त्रीय व सुगम संगीताचेही धडे गिरवत प्रावीण्य मिळवत आहेत. कृष्णाला कापड दुकान टाकून देत स्वतःच्या पायावर उभं केलं. तिची लढाई, संघर्ष कुठंतरी समाजासमोर मांडला पाहिजे. स्त्रीभ्रूणहत्या, स्त्री-पुरुष समानता या गोष्टी केवळ कागदावरच न राहता त्या प्रत्यक्षात आल्या पाहिजेत. यासाठी लेखन केल्याचे कृष्णा सांगतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com